आघाडी सरकारच्या पुतळ्याला शेतकऱ्यांनी मारले चाबकाचे फटकारे.. - Farmers beat the statue of the Mahavikas Aghadi Sarkar  | Politics Marathi News - Sarkarnama

आघाडी सरकारच्या पुतळ्याला शेतकऱ्यांनी मारले चाबकाचे फटकारे..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

लॅाकडाउन काळात दूधाचे दर पडल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे,

पंढरपूर  :  गाईच्या दुधाला 30 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये प्रती लिटर दर मिळावा, या मागणीसाठी आज पंढरपूर - विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावरील एकलासपूर (ता.पंढरपूर)  येथे रयत क्रांती  संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.  यावेळी शेतकऱ्यांनी  महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून चाबकाचे फटकारे मारण्यात आले. Farmers beat the statue of the Mahavikas Aghadi Sarkar 

लॅाकडाउन काळात दूधाचे दर पडल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे, त्यातच पशुखाद्याचे दर वाढले आहेत. याचा आर्थिक फटका राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना  बसला. सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यामधून संताप व्यक्त केला जात आहे.  दूध दरात वाढ करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. हीच मागणी घेऊन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली  संघटनेचे  कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात दूध दरवाढ आंदोलन केले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

माजी खासदाराच्या टि्वटमुळे काँग्रेसच्या चिंतेत वाढ.. 

आज सकाळी रयत क्रांती संघनेचे कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येत पंढरपूर -विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला सुमारे 100 लिटर दुधाचा अभिषेक घालून त्याच पुतळ्याला शेतकऱ्यांनी चाबकाचे फटके दिले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दूध दरात वाढ करावी अशी मागणी करत राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सरकारचा प्रतिकारात्मक पुतळा ताब्यात घेतला. यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी  दूध दरवाढी संदर्भातील लेखी निवेदन  स्विकारल्यानंतर  आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संघटनेचे  बबलू ताड, पांडुरंग शिंदे, अनिल गायकवाड, दाजी ताड, सचिन पाटील, दादा घाटूळ, शंकर गवळी,सावकार शिंदे महावीर गायकवाड, सुनिल शिंदे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

 
दररोज दूध उत्पादक शेतकऱ्यांचे 20 कोटीचे नुकसान

राज्यात दररोज गाईचे 1 कोटी 76 हजार  तर म्हशीचे 25 लाख लिटर दूधाचे उत्पादन होते. दररोज सरासरी दोन कोटी लिटरचे शेतकरी उत्पादन करतात. मागील काही दिवसापासून प्रती लिटर दहा रुपयांनी दर कमी केला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांचे दररोज 20 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. राज्य सरकारने येत्या आठ दिवसात दूधदर वाढ जाहीर करावी, अन्यथा मुंबई व पुण्याला होणारी दूधाची वाहतूक बंद पाडू, असा इशाराही रयत क्रांतीचे कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख