आणीबाणी : नातेवाईकांनाच थेट कंपनीतून आणावा लागतोय अॅाक्सीजन - Family members of corona patients were seen outside oxygen plants | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

आणीबाणी : नातेवाईकांनाच थेट कंपनीतून आणावा लागतोय अॅाक्सीजन

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 एप्रिल 2021

रुग्णसंख्या वाढत असल्याने अॅाक्सीजनची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने बहुतेक रुग्णालयांमध्ये बेड मिळणेही कठीण झाले आहे. तसेच अॅाक्सीजनची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, अनेक ठिकाणी अॅाक्सीजन तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. याबाबत केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात असले तरी ते तोकडे पडत असल्याची स्थिती आहे.

मागील काही दिवसांपासून बिहार व उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत चालला आहे. त्यातुलनेत बेड कमी पडत असून अॅाक्सीजनचा पुरवठाही अपुरा आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या रुग्णांना अॅाक्सीजन कमी पडू नये यासाठी नातेवाईकांना थेट कंपनीच्या दारात जावे लागत आहे. तिथून अॅाक्सीजनने भरलेले सिलेंडर घेऊन रुग्णालय गाठावे लागत असल्याची स्थिती आहे. 

रुग्णालयांकडूनच अॅाक्सीजनची व्यवस्था करणे अपेक्षित असताना नातेवाईकांवर ही वेळ आली आहे. त्यासाठी तासन् तास वाट पाहावी लागत आहे. काही ठिकाणी अॅाक्सीजन सिलेंडर असल्याशिवाय रुग्णांना दाखलही करून घेतले जात नाही.  तसेच नातेवाईकांची सिलेंडरसाठी आर्थिक लुटही सुरू आहे. बिहार व उत्तर प्रदेशामध्ये चार ते पाच पटीने अॅाक्सीजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे मोठा तुटवडा जाणवू लागला आहे.

एका अॅाक्सीजन प्रकल्पातील कर्मचाऱ्याने सांगितले की, ''अॅाक्सजीनची खूप मागणी वाढली आहे. आम्ही ही मागणी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना परत पाठवावे लागत आहे.'' उत्तर प्रदेशातील वाराणशीमध्येही अॅाक्सीजनचा मोठा तुटवडा आहे. एका अॅाक्सीजन प्रकल्पाच्या व्यवस्थापकाने सांगितले की, दररोज 1500 ते 2000 फोन येत आहेत. आम्ही आमच्या पूर्ण क्षमतेने काम करत आहोत. दररोज 1400 सिलेंडर अॅाक्सीजन उत्पादित होत आहे. इतर दिवसांच्या तुलनेत ही मागणी 4 ते 5 पटीने वाढली आहे.

दिल्लीमध्येही अॅाक्सीजनचा तुटवडा जाणवत असल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. लोकांना अॅाक्सीजन सिलेंडर काळ्या बाजारांतून लाखो रुपयांना घ्यावा लागत आहे. प्रत्यक्ष बाजारात त्याची किंमत काही हजार आहे. अॅाक्सीजनचा काळाबाजार करणाऱ्यांना थेट तुरूंगात टाकण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख