अतिवृष्टीतील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नऊ लाखांची मदत

भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा
Sarkarnama Banner - 2021-07-27T101912.649.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-27T101912.649.jpg

सातारा : राज्यात मागील आठवड्यात दरडी कोसळून व पुरामुळे 180 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 91 जण रायगड जिल्ह्यात मृत पावले आहेत. त्यानंतर सातारा जिल्ह्यात 41 जणांचा, रत्नागिरी 21, ठाणे 12, कोल्हापूर 7, मुंबई 4, पुणे व सिंधुदूर्ग जिल्ह्यात प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 हजार 248 जनावरंही दगावली आहे. सुमारे 17 हजार 300 कोंबड्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली. जवळपास 30 अजूनही बेपत्ता असून 50 ते 55 जण जखमी झाले आहेत. 

अतिवृष्टीतील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नऊ लाखांची मदत मिळणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथे केली.  राज्‍य सरकारकडून पाच लाख रुपये, पीएम केअरमधून दोन लाख रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून दोन लाख रुपये अशी एकूण नऊ लाखांची मदत  मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे. 

सातारा जिल्ह्यातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा, त्यांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी त्यांच्या शेताजवळील जागेचा शोध घ्यावा. तसेच पुनर्वसनासाठी निवडलेल्या संबंधित जागेबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या.

सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी, पुरस्थितीसह भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते. या आढावा बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण)  राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ''अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठे नुकसान होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तुटलेल्या गावांचा संपर्क पुर्ववत होण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची कामे तात्काळ करा. त्यानंतर कायमस्वरुपी रस्त्यांचा प्रस्ताव सादर करावा. जिल्ह्यातील काही रस्त्यांवर ब्रिटीशकालीन मोऱ्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचारा होऊ शकला नाही. यापुढे अशा ठिकाणी ब्लॉक पद्धतीने किंवा स्लँब टाकून रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यात यावी. 

या अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. खंडीत वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी आज 100 कर्मचाऱ्यांची टीम काम करीत आहेत. त्यांना ज्या काही बाबी लागणार आहेत, त्या उपलब्ध करुन द्या. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख, केंद्र सरकारकडून 2 लाख व शेतकरी असल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून 2 लाखाचाही लाभ देण्यात यावा. ज्या गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना अतिवृष्टीमुळे वाहून गेल्यात किंवा खराब झाल्या आहेत अशा गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा. 

घरांचे, शेतीचे, पशुधनाचे तसेच शासकीय मालमत्तेचे पंचनामे लवकरात लवकर करा. ज्या नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे त्यांना अन्नधान्य, औषधे व इतर बाबी द्या. मदत करीत असताना कोणत्याही तांत्रिक बाबी अडचण येणार नाहीत, असे प्रस्ताव तयार करा, अशा सूचनाही पवार यांनी बैठकीत केल्या.

जिल्ह्यात पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे जिवीत हानी, शेत जमिनीचे, रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. भूस्खलन झालेल्या गावांमध्ये जिल्हा प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले. जिल्ह्याचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. नुकसानीची भरपाई करण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केली. 

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. या बैठकीत आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण यांनीही सूचना केल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com