गुंड मारणे प्रकरण माजी खासदार संजय काकडेंना भोवणार : पुणे पोलिसांनी केले अटक - EX MP Sanjay Kakade arrested by Pune Police | Politics Marathi News - Sarkarnama

गुंड मारणे प्रकरण माजी खासदार संजय काकडेंना भोवणार : पुणे पोलिसांनी केले अटक

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

मारणेला पाठिंबा देणाऱ्याच्या शोधात पुणे पोलिस

पुणे : राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांना पोलिसांनी अटक केल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. पुण्यात कुख्यात गुंड गजानन मारणे संबंधावरून तर पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. आज सकाळी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुणे शहर सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी कारवाईला दुजोरा दिला. 

काकडेे हे  भाजपचे नेते असून राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संंबंध आहेत. गुंड मारणे आणि निलेश घायवळ या दोघांत समेट घडवून आणण्यात काकडे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात होते. मारणे याची एका खून प्रकरणातून सुटका झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तळोजा जेल ते पुणे अशी मोठी वाहनांची रॅली काढण्यात आली होती. त्यावरून पुणे पोलिसांवर प्रचंड टीका झाली. त्यानंतर या रॅलीत सहभागी असलेली वाहने, कार्यकर्ते आणि त्यांना पाठिंबा देणारे नेते यांच्यावर कारवाई सुरू झाली. या कारवाईत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत दोनशेहून अधिक वाहने ताब्यात घेतली. मारणेवर बेकायदा रॅली जमविणे, वडापावचे पैसे न दिल्याने खंडणी आदी गुन्हे दाखल करण्यात आले.

या काळात तो फरार झाला. एका गुन्ह्यात पोलिसांना न कळता त्याने तळेगाव दाभाडे येथून जामीनही मिळवला. त्यानंतर पुणे पोलिसांच्या जखमेवर आणखी मीठ चोळले गेले. तेथून मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू झाली. काकडे आणि मारणे यांच्यात या साऱ्या घडामोडींच्या काळात काही संभाषण झाल्याच्या संशयावरून काकडे यांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केल्याचे समजते आहे. मारणे सध्या प्रतिबंधक कायद्याखाली तुरुंगात आहे. दुसरा गुंड निलेश घायवळ यालाही अटक करून तुरुंगात डांबण्यात आले आहे. 

काकडे यांनी सध्या राजकारणापासून अलिप्त राहून पुन्हा व्यवसायाकडे लक्ष दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे गेली काही महिने त्यांनी राजकीय वक्तव्य जाणीवपूर्वक टाळले होते. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांनी पुन्हा सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख