एक लाखाची लीड देऊनही दानवेंनी मला त्रास दिला..

विधानसभेच्या वेळेस दानवे माझ्या मागे लागले, मला प्रचंड त्रास दिला. शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांचा तर बळी त्यांनी घेतलाच, पण नशिबाने मी मात्र वाचलो. रावसाहेब दानवे यांना आमच्या भागात चकवा म्हणून ओळखतात,यामागे काम निघून गेली की त्रास द्यायचा ही त्यांची वृत्ती हेच कारण असल्याचा टोला देखील सत्तार यांनी यावेळी लगावला.
Minister Abdul Sattar Criticised danve news
Minister Abdul Sattar Criticised danve news

औरंगाबाद : ज्या रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याची शपथ घेऊन डोक्यावर टोपी घातली आणि त्यांना पराभूत केल्याशिवाय ही टोपी काढणार नाही असा प्रण केला त्यांनाच निवडून आणण्याची जबाबदारी त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर सोपवली. त्यामुळे माझ्या डोक्यावरील टोपीचा मुक्काम पाच वर्षांनी वाढला. ज्या दानवे यांना माझ्या मतदारसंघातून मी एक लाखाची लीड दिली, त्यांनीच मला विधानसभा निवडणुकीत त्रास दिल्याचा आरोप शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिर्डी येथे केला.

औरंगाबाद व जालना जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तसेच मैत्रीचे किस्से राजकारणात चवीने चर्चिले जातात. एकमेकांवर आरोप करताना हातचं न राखणारे  हे दोन नेते एका व्यासपीठावर आल्यानंतर मात्र आम्ही कसे एकच आहोत हे सांगायला देखील विसरत नाहीत. 

शिर्डी येथे बोलताना अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांच्यावर तोफ डागत आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत दानवे यांना पराभूत करण्याचा विडा मी उचलला होता, पण पुढे त्यांनाच निवडून आणण्याची जबाबदारी मुंबईच्या बैठकीत फडणवीसांनी माझ्यावर टाकली, त्यामुळे माझी अडचण झाली. या बैठकीतच मी दानवे काम निघून गेल्यानंतर कोयता घेऊन माझ्या मागे लागतील,असा धोका बोलून दाखवला होता. परंतु वरिष्ठांनी असे काही होणार नाही, तुम्हाला दानवेंना निवडून आणावे लागेल ,असे सांगत मला भरीस पाडले.

मी लोकसभेला दानवेंचे प्रामाणिकपणे काम करून त्यांना माझ्या मतदारसंघातून एक लाखाची लीड दिली, पण पुढे व्हायचे तेच झाले. विधानसभेच्या वेळेस दानवे माझ्या मागे लागले, मला प्रचंड त्रास दिला. शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांचा तर बळी त्यांनी घेतलाच, पण नशिबाने मी मात्र वाचलो. रावसाहेब दानवे यांना आमच्या भागात चकवा म्हणून ओळखतात,यामागे काम निघून गेली की त्रास द्यायचा ही त्यांची वृत्ती हेच कारण असल्याचा टोला देखील सत्तार यांनी यावेळी लगावला.

 पुढाऱ्यांनी टोपी घालने ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे.  पण मी कायम टोपी घालणारा राजकारणी नाही. दानवेमुळे माझ्या डोक्यावर ही टोपी आली आहे. आता या टोपीचा मुक्काम आणखी पाच वर्षे वाढला, याचा पुनरुच्चार करत  सत्तार यांनी धमाल उडवून दिली. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com