ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना अजित पवार यांच्या अर्थखात्याचा शाॅक!

वीजबिलात सवलत न मिळाल्याने सध्या राऊत यांच्याविरोधात आक्रोश
Ajit Pawar-Nitin Raut
Ajit Pawar-Nitin Raut

पुणे : शिवसेनचे मंत्री अनिल परब यांच्या परिवहन खात्याला अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीने एक हजार कोटी रुपये दिले. मात्र काॅंग्रेसचे मंत्री असलेल्या नितीन राऊत यांच्या ऊर्जा खात्याला राज्य सरकारने अशी मदत करण्यास आतापर्यंत तरी नकार दिल्याने सध्या राऊत यांची कोंडी झाली आहे.

कोरोना लाॅकडाऊन काळातील वीजबिलांच्या प्रश्नावरून सध्या राज्यात रण पेटले आहे. विरोधी पक्ष, विविध संघटना वीजबिल न भरण्याबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत. गेले आठ महिने वीजबिलांची वसुली न झाल्याने महावितरण कंपनीही आर्थिक संकटात सापडली आहे. सुमारे सात  हजार कोटी रुपयांची थकबाकी अडकल्याने कंपनीच्या अस्तित्त्वालाचा धोका निर्णाण झाला आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी ऊर्जा खात्याने दिवाळी संपल्यानंतर आदेश दिले. मात्र वीजजोड तोडण्यास सध्या तरी मनाई आहे. वीज कनेक्शन तोडल्याशिवाय वसुली होणार नसल्याने कर्मचारीही हतबल आहेत. 

नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा केल्याचा दावा भाजपने केला आहे. ही घोषणा विधीमंडळात होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला. मनसेने वीजकनेक्शन तोडल्यास खळखट्याकने प्रत्युत्तर देण्याचे जाहीर केले आहे.

वीजबिलात सवलत द्यायची असेल तर अर्थखात्याची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. राज्याच्या तिजोरीतही कोरोना संकटामुळे खडखडाट असल्याने या वर निर्णय़ होऊ शकला नाही. दुसरीकडे राऊत यांनाचा आता टिकेचे धनी व्हावे लागत आहे. काॅंग्रेस मंत्री किंवा आमदार यांना कमी निधी मिळत असल्याची तक्रार महाविकास आघाडी सरकारमध्ये होत आहे. राऊत यांच्या ऊर्जा खात्याला मदत न मिळाल्यास हा मुद्दा पुढे घटक पक्षांतही चर्चेच येऊ शकतो. सध्या तरी सारे वार राऊत सहन करत आहेत. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे असेच भिजत घोंगडे होते. दिवाळीच्या आधी दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर सरकार खडबडून जागे झाले. मंत्री अनिल परब आणि पर्यायाने शिवसेनेवर जोरात टीका होऊ लागली.  कोरोनावर मात करून अजित पवार रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांनी तातडीने परिवहन खात्याला एक हजार कोटींचा निधी दिला. एसटी आणि महावितरण ही दोन्ही राज्य महामंडळे आहेत. त्यामुळे सरकार अशा अडचणीच्या काळात आर्थिक देण्यांसाठी तरतूद करते.  आता राऊत यांच्यासाठी अर्थखाते कधी तिजोरी खुली करणार याकडे लक्ष आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com