कोरोनाच्या धसक्‍याने घरच्या जेवणावर भर - Emphasis on home-cooked meals with a coronary artery | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाच्या धसक्‍याने घरच्या जेवणावर भर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

"लोकल सर्कल' या कंपनीने देशभरात केलेल्या सर्व्हेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. सर्व्हेक्षणासाठी देभरातील 33 हजार ग्राहकांशी संवाद साधला गेला.

मुंबई : कोरोना संसर्ग होण्याच्या भीतीने नागरिक घरच्या जेवणावर अधिक भर देत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने रेस्टॉरंट उघडण्यास परवानगी दिली होती; मात्र या काळात हॉटेलकडे नागरिक फिरकलेच नाहीत.

या 60 दिवसांत 70 टक्के नागरिकांनी बाहेरचे जेवण्यावर अघोषित बहिष्कार टाकला होता. केवळ चार टक्के नागरिकांनी हॉटेल, रेस्टॉरंटमधील जेवणाचा आस्वाद घेतला. भविष्यातही रेस्टॉरंटमध्ये जाण्यापेक्षा घरीच जेवण मागवून घेण्याचा नागरिकांचा विचार आहे.

घरचे जेवण बरे
देशभरात रेस्टॉरंट उघडून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. महाराष्ट्रात अजूनही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाण्यास परवानगी मिळालेली नाही; मात्र या 60 दिवसांत हॉटेलमध्ये जेवणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. जवळपास 70 टक्के ग्राहकांनी बाहेरचे जेवण टाळणे पसंत केले. म्हणजे बहुतांश ग्राहक रेस्टॉरंटमध्ये गेले नाही किंवा घरपोच जेवणही मागवले नाही. केवळ दोन टक्के नागरिकांनी आम्ही अनेकदा रेस्टॉरंटमध्ये जेवल्याचे सांगितले. तीन टक्के लोकांनी एकदा जेवल्याचे म्हटलेय; तर 21 टक्के ग्राहकांनी घरपोच जेवण मागवून घेतल्याचे म्हटले.
...
भविष्यातही "होम डिलीव्हरी'ला पसंती
या सर्व्हेक्षणात भविष्यात ग्राहकांचा रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा विचार आहे का, याचाही धांडोळा घेण्यात आला. पुढच्या 60 दिवसांत तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाणार का, असा प्रश्‍न नागरिकांना विचारला गेला. त्या वेळी केवळ 34 टक्के नागरिकांनी रेस्टॉरंटमध्ये जेवण्याचा बेत असल्याचे उत्तर दिले आहे. यामध्ये बहुतांश जण घरपोच जेवण मागवणार आहेत. जवळपास 62 टक्के लोकांनी हॉटेलमध्ये जाणे किंवा घरपोच जेवण मागवण्याचा कुठलाही विचार नसल्याचे सांगितले.
...
भारतीय जेवणाला प्राधान्य
कुठल्या प्रकारचे जेवण मागवण्याचा तुमचा विचार आहे, असाही प्रश्‍न ग्राहकांना विचारला गेला. त्यावर 11 टक्के नागरिकांनी आंतराष्ट्रीय मेन्यू, 46 टक्के नागरिकांनी भारतीय जेवण मागवणार असल्याचे सांगितले आहे; तर 6 टक्के नागरिकांनी फास्ट फूड, 14 टक्के नागरिकांनी गोड किवा बेकरी पदार्थ मागवणार असल्याचे म्हटले. यापैकी 14 टक्के नागरिकांचा मांसाहारी जेवणाचा बेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोनाचा फटका
कोरोनामुळे हॉटेल, रेस्टॉरंट क्षेत्राला जबर फटका बसला आहे. या फटक्‍यातून अजूनही हा उद्योग सावरू शकला नाही. झोमॅटो, स्विगी या होम डिलीव्हरी सेवेतील अग्रगण्य कंपन्यांनीदेखील त्यांचा व्यवसाय गतवर्षीच्या तुलनेत केवळ 50 टक्के आल्याचे म्हटले आहे. मुंबईसह राज्यात अजूनही डायनिंग रेस्टॉरंटला परवानगी मिळाली नाही. त्यामुळे 40 ते 50 टक्के हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ग्राहकांचा हा कल बघता हॉटेल क्षेत्र अधिकच गोत्यात जाण्याची शक्‍यता असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.
...
नागरिकांच्या मनात कोरोना संसर्गाची भीती आहे; मात्र आम्ही कोव्हिडचे सर्व नियम पाळण्यास, स्वच्छता ठेवायला सज्ज आहोत. रेस्टॉरंट उघडल्यावर प्रत्यक्ष ग्राहक यायला सुरुवात झाली, तर त्यांच्या मनातील भीती कमी होण्यास मदत होईल; मात्र सरकारने रेस्टॉरंट उघडण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
- शिवानंद शेट्टी, अध्यक्ष, आहार संघटना

सर्व्हेक्षणातील ठळक बाबी
- कोव्हिडच्या भीतीमुळे घरच्या जेवणाला प्राधान्य
- गेल्या दोन महिन्यांत 28 टक्के लोकांची हॉटेलच्या जेवणाला पसंती
- 70 टक्के लोकांनी हॉटेलचे/बाहेरचे जेवण टाळले
- आगामी 60 दिवसांत 34 टक्के लोकांचा बाहेरच्या जेवणाचा बेत
- भविष्यात घरपोच जेवण मागवण्याचा अधिक कल
- घरपोच जेवणात 46 टक्‍क्‍यांची भारतीय जेवणाला पसंती
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख