कंगनाच्या दिमतीसाठी असणार अकरा कमांडो! जाणूून घ्या X, Y आणि Z सुरक्षाव्यवस्था! - eleven cammondos for security of Kangana as she gets Y security | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाच्या दिमतीसाठी असणार अकरा कमांडो! जाणूून घ्या X, Y आणि Z सुरक्षाव्यवस्था!

उमेश घोंगडे
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

सरकारी पदावर नसतानाही फार कमी लोकांना सरकारतर्फे सुरक्षाव्यवस्था मिळते. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत, योगगुरू रामदेव, उद्योगपती मुकेश अंबानी यांचा समावेश आहे. यात आता कंगनाचीही वर्णी लागली आहे. 

पुणे : राज्य सरकार आणि शिवसेनेशी पंगा घेतलेली अभिनेत्री कंगना राणावत हिला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. शिवसेनेशी वाकयुद्ध सुरू झाल्यानंतर नऊ सप्टेबरला मुंबईत येण्याची घोषणा कंगनाने केली असून मुंबईत येण्यापासून अडवून दाखविण्याचे आव्हान तिने शिवसेनेला दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने तिच्या सुरक्षेची विशेष व्यवस्था केली आहे.

या निमित्ताने झेड, झेड प्लस व वाय दर्जाच्या सुरक्षेची चर्चा सोशल मिडीयात सुरू झाली. वाय दर्जाची सुरक्षा म्हणजे काय असते याची उत्सुकता अनेकांनी दाखविली आहे. ही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था नॅशनल सिक्‍यिुरिटी गार्डच्या (एनएसजी) माध्यमातून देण्यात येते. वाय दर्जाच्या सुरक्षेत 11 सशस्त्र एनएसजी जवान असतात. त्यामध्ये दोन सशस्त्र कमांडोंचा समावेश असतो. या शिवाय स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाते. कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आल्याने ही सारी सुरक्षा व्यवस्था तिच्यासाठी तातडीने लागू होणार आहे. नऊ सप्टेंबरला कंगना राणावत मुंबईत येणार असून मुंबईत येताना तिच्यासाठी ही सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.

झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री यांच्यासाठी देण्यात येते. या व्यवस्थेत एनएसजीचे 50 जवान असतात. यामध्ये दहापेक्षा जास्त सशस्त्र कमांडो असतात. अर्थात पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी ही `एसपीजी`वर (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) आहे. `एसपीजी`ची सुरक्षा व्यवस्था आधी इतर नेत्यांनाही होती. मात्र त्यासाठ कायद्यात बदल करून ही व्यवस्था केवळ पंतप्रधानांसाठी ठेवण्यात आली आहे. इतर नेत्यांच्या सुरक्षेसाठी एनएसजी किंवा केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान असतात. 

झेड सुरक्षा व्यवस्थेत 22 जवान असतात. यात पाच शसस्त्र कमांडो असतात. या व्यतिरिक्त स्थानिक पोलीसांचे व्यवस्था असते. ज्यांच्या जीवाला धोका आहे, असा अहवाल केंद्र सरकारला मिळतो. त्यांना केंद्र सरकार सुरक्षा व्यवस्था पुरवते. एक्स सुरक्षाव्यवस्थेत केवळ दोन कर्मचारी असतात. ते कमांडो असतीलच, असे नव्हे. 

सुशांतसिंग प्रकरणातून सुरू झालेले वाकयुद्ध थांबायला तयार नाही. कंगनाच्या विरूद्ध राज्य सरकार व शिवसेना असे आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनावर थेट हल्ला केल्यानंतर हे प्रकरण आणखी तापले असून कंगना नऊ सप्टेबरला मुंबईत आल्यानंतर नेमके काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख