फाईव्ह स्टार संस्कृतीमुळे निवडणुका जिंकता येत नाहीत..आझादांचा काँग्रेसला घरचा आहेर - Elections cannot be won due to five star culture  Azad criticizes the working of Congress | Politics Marathi News - Sarkarnama

फाईव्ह स्टार संस्कृतीमुळे निवडणुका जिंकता येत नाहीत..आझादांचा काँग्रेसला घरचा आहेर

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बसून निवडणूक लढवल्या जात नाहीत. आता एखाद्याला पद मिळाल्यास तो लगेच व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड छापतो. आता आपलं काम संपलं असं त्याला वाटतं.

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्त्वावर थेट निशाणा साधल्यानंतर आता गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आझाद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवलं आहे. काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. 

आझाद यांनी दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ''पहिल्यांदाच पक्षाची स्थिती इतकी दयनीय आहे. पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला संवाद संपला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बसून निवडणूक लढवल्या जात नाहीत. आता एखाद्याला पद मिळाल्यास तो लगेच व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड छापतो. आता आपलं काम संपलं असं त्याला वाटतं. मात्र खरंतर पद मिळाल्यापासून त्याचं काम सुरू होतं. पण ही जाणीव अनेकांना नसते, अशा स्पष्ट शब्दांत आझाद यांनी त्यांची मतं मांडली.", 

दोन लोकसभा निवडणुकांसह अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसमधील कलह आता समोर येऊ लागले आहेत. त्यांनी नेतृत्त्वावर थेट टीका केली नसली तरी पक्षामध्ये अनेक आमूलाग्र बदल घडवण्याची मागणी केली आहे. पक्षात कोणतीही बंडखोरी नसल्याचं आझाद यांनी स्पष्ट केलं आहे.

पक्षातील बंडखोरीबाबात ते म्हणाले की बंडखोरी एखाद्याला हटवण्यासाठी होते. वजीर राजावर सैन्य घेऊन हल्ला चढवतो आणि राजाला सिंहासन गमवावं लागतं, याला बंडखोरी म्हणतात. काँग्रेसमध्ये तशी स्थिती नाही. इथे आम्ही काही बदलांसाठी आग्रही आहोत. इथे वजीर राजाला त्याची चूक दाखवत आहेत. एखाद्या कृतीचे, निर्णयाचे परिणाम वजीर राजाला सांगत आहे. त्याला सतर्क करत आहे. आम्ही बदलांची मागणी करत आहोत. कारण बदल झाल्यास पक्ष आणि देश अडचणीत सापडेल.  

आझाद म्हणाले, "जोपर्यंत पक्षातील ही फाईव्ह स्टार संस्कृती संपत नाही, तोपर्यंत आपण निवडणुका जिंकू शकणार नाही. फाईव्ह स्टार संस्कृतीमुळे निवडणुका जिंकता येत नाहीत. आता पक्षाच्या नेत्यांना उमेदवारी मिळाल्यास ते थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जातात. त्यातही फाईव्ह स्टारमधील डिलक्सला प्राधान्य असतं. त्यांना फिरण्यासाठी वातानुकूलित कार हवी असते. एखाद्या ठिकाणी कच्चा रस्ता असल्यास नेते तिथे जात नाहीत."
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख