विधानसभा अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम - election of the Speaker of the Legislative Assembly has not been fixed | Politics Marathi News - Sarkarnama

विधानसभा अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 जुलै 2021

नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री ठाकरे हे नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशानात व्हावी ही महाविकास आघाडीचीही इच्छा आहे. परंतु या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष राज्यपालांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करत आहे,  असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या Legislative Assembly निवडणुकीचा सस्पेन्स अद्याप कायम असून याची तारीखही ठरेना आणि उमेदवारही निश्‍चित होईना, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. 

नाना पटोले म्हणाले, ‘‘पक्षाच्या आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर ती वरिष्ठ नेत्यांना कळविण्यात येतील आणि त्यानंतर उमेदवार जाहीर होईल. अधिवेशनात आमदारांचे संख्याबळ कमी होईल म्हणून व्हीप काढलेला नाही तर तो एक प्रक्रियेचा भाग आहे. आघाडीच्या आमदारांवर आमचा विश्‍वास आहे.’’ राज्य विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात येत्या ६ जुलैला अध्यक्षपदासाठीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. खनिकर्म विभागातील गैरव्यवहारानंतर पटोले यांनी शुक्रवारी पुन्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चिमटा काढला. राऊत यांना सध्या काँग्रेसची चिंता आहे. ही बाब आमच्यासाठी चांगली आहे. ही चिंता त्यांनी कायम करावी, असा टोला पटोले यांनी लगावला. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांत कोणतेही मतभेद नसल्याचेही सांगायला ते विसरले नाहीत.

या विधिमंडळाच्या अधिनवेशनात महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे , अशा परिस्थितीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील वाद चव्हाट्यावर आला आहे.  राज्याच्या खनिकर्म खात्याने काढलेल्या निविदांवर बोट ठेवून, या कामांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हे  खाते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अखत्यारित असल्याने सरकारला घरचा आहेर मिळाला आहे.
कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पटोले यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री ठाकरे हे नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास ठाकरे यांनी पटोले यांना विरोध केला होता. तरीही पटोले यांनी राजीनामा दिल्याने ठाकरे-पटोले यांच्यातील मतभेद वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर पटोले यांनी आता शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामांवर शंका उपस्थित करीत, पत्रच पाठविल्याने छुपा संघर्ष उघड झाल्याचे बोलले जात आहे.
 
खनिकर्म खात्याने काढलेल्या निविदेत गैरव्यवहार असून, ठराविक लोकांनाच कामे दिल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. यानिमित्ताने अधिवेशनाआधीच काँग्रेसनेच विरोधकांच्या हाती कोलीत दिले आहे. त्यामुळे पटोले यांच्या पत्राची दखल देत, भाजप नेते आता थेट मुख्यमंत्री ठाकरे यांनाच ‘टार्गेट’ करणार असल्याचे स्पष्ट आहे. खनिकर्म महामंडळाने (नागपूर विभाग) एका प्रकल्पाला कोळसा पुरवठा करण्यासाठी निविदा काढून, ते काम ठराविक कंपनीला दिले आहे. 
Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख