ममतांनंतर भाजपच्या बड्या नेत्याला प्रचारबंदी; प्रदेशाध्यक्षही रडारवर

ममता बॅनर्जी यांच्यावर 24 तासाच्या प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली आहे.
Election Commission imposes a ban on BJP leader Rahul Sinha
Election Commission imposes a ban on BJP leader Rahul Sinha

कोलकाता : पश्चिम बंगालमधील राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. काल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चोवीस तासांची प्रचारबंदी करण्यात आली. तर आज भाजपच्या एका बड्या नेत्यावर 48 तासांच्या प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली. तसेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनाही वादग्रस्त वक्तव्यावरून नोटीस बजावण्यात आली आहे. 

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगले तापलेले असताना तृणमूल काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचारादरम्यान केलेले हिंदु-मुस्लिम व सीआरपीएफच्या विरोधात लोकांना भडकावल्याचे वक्तव्य महागात पडले आहे. आयोगाने ममतांना पुढील 24 तासांसाठी प्रचारबंदी केली आहे. आज रात्री आठ वाजेपर्यंत ममतांना प्रचार करता येणार नाही. मात्र आयोगाच्या या निर्णयाविरोधात ममतांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. कोलकातामधील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर रात्री आठ वाजेपर्यंत त्या आंदोलन करणार आहेत. 

एकीकडे ममतांचे आंदोलन सुरू असतानाच निवडणूक आयोगाने भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व उमेदवार राहुल सिन्हा यांच्यावर 48 तासांच्या प्रचारबंदीची कारवाई केली आहे. त्यांना 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत प्रचार करता येणार नाही. कुचबिहारमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. 

चार नव्हे आठ लोकांना मारायला हवे होते

''कुचबिहारमधील सीतलकूचीमध्ये चार नव्हे तर आठ लोकांना मारायला हवे होते. त्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाला कारणे दाखवा नोटीस पाठवायला हवी. त्यांनी केवळ चार जणांनाच का मारले? आठ जणांना मारायला हवे होते. येथील गुंडांचा लोकशाहीतील अधिकारी काढून घ्यायला हवेत. केंद्रीय दलांनी योग्य उत्तर दिलं. पुन्हा असे घडल्यास ते त्याला जोरदार प्रत्युत्तर देतील,'' असे वक्तव्य सिन्हा यांनी केले होते.

दिलीप घोषही रडारवर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषही निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत. त्यांनी कुचबिहारमधील घटनेनंतर वादग्रस्त वक्तव्य केले होते. तृमणूल काँग्रेसने त्यावर जोरदार टीका केली. तसेच आयोगाकडे कारवाईची मागणीही केली आहे. ''कायदा हातात घेतल्यानंतर अशाच गोळ्या खाव्या लागतील. कायदा हातात घेतला तर अशा घटना होत राहतील,'' असे घोष म्हणाले होते. 

दरम्यान, बंगालमधील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदार पार पडले असून अजून चार टप्पे शिल्लक आहेत. तृणमूलसाठी ममता बॅनर्जी या एकट्याच किल्ला लढवत आहेत. त्यातच त्यांच्या पायाला दुखापत झालेली असल्याने त्यांच्या प्रचाराला आधीच मर्यादा आल्या आहेत. पण त्यानंतर त्या भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com