महाआघाडी विरुद्ध भाजप पहिला सामना : पाच विधान परिषद मतदारसंघांची निवडणूक जाहीर - election commission announces date for five mlc seats in the state | Politics Marathi News - Sarkarnama

महाआघाडी विरुद्ध भाजप पहिला सामना : पाच विधान परिषद मतदारसंघांची निवडणूक जाहीर

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

भाजप आणि महाआघाडी यांच्यात पहिला सामना रंगणार 

पुणे : राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर पहिल्यांदा अशी निवडणूक होत आहे. सरकारमधील घटक पक्ष असलेले हे भाजपच्या विरोधात एकत्र उमेदवार देणार की स्वतंत्रपणे लढणार, याची उत्सुकता असणार आहे. पदवीधरमधील तीनपैकी दोन जागा या सध्या भाजपकडे आहेत. त्या भाजप राखणार का, याचेही औत्सुक्य असणार आहे. 

त्यानुसार एक डिसेंबर रोजी मतदान होणा असून तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे असणार आहे.

अधिसूचना व उमेदवारी अर्ज दाखल करणे- पाच नोव्हेंबर 2020

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत- 12 नोव्हेंबर

उमेदवारी अर्जांची छानणी- 13 नोव्हेंबर

अर्ज माघार घेण्याची मुदत- 17 नोव्हेंबर

मतदानाची तारीख व वेळ-  1 डिसेंबर, सकाळी 8 ते सायंकाळी 5

मतमोजणी- 3 डिसेंबर

पुणे पदवीधर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे आमदार होते. त्यांची विधानसभेवर नियुक्ती झाल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती. याशिवाय औरंगाबाद पदवीधरमधून राष्ट्रवादीचे सतिश चव्हाण हे तर नागपूर पदवीधरमधून भाजपचे अनिल सोले हे आमदार आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघाचे दत्तात्रेय सावंत तर अमरावती शिक्षक मतदारसंघाचे श्रीकांत देशपांडे हे प्रतिनिधित्व करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने सर्व प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी करण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच गर्दी जमविण्यावरही नियंत्रण आणले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख