राष्ट्रवादी प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंची पुन्हा `झाकली मूठ` - eknath khadse says no comments on joining of NCP | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादी प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंची पुन्हा `झाकली मूठ`

कैलास शिंदे
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

राजकीय चर्चां व अंदाजावर ब्रेक लागेना!

जळगाव : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे मुहूर्त आपले नव्हे तर ते माध्यमांचे आहेत, असे वक्तव्य करत पुन्हा आपली झाकली मूठ ठेवली आहे.

खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी  (ता. १७) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र आज खडसे यांनीच याबाबत नकार दिला आहे.जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत आपण कोणताही मुहूर्त सांगितला नाही. हे सर्व मुहूर्त माध्यमांनी काढले आहेत. या प्रवेशाच्या बाबत मला काहीही बोलावयाचे नाही. त्याबाबत आपले `नो कॉमेंट्स` असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

खडसेंच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा राजकीय चर्चा सुरू होऊन ते पुढे काय करणार, याची अंदाजबांधणी सुरूच राहणार आहे. खडसे यांच्या संदर्भात तीन विविध प्रमुख नेत्यांनी वक्तव्ये केली. भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी खडसे हे भाजप सोडणार नसल्याचा दावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खडसे यांच्या प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्षच सांगू शकतील, अशी माहिती दिली.

या साऱ्या नेत्यांच्या वक्तव्ये आणि त्यावर खडसे यांचे `नो काॅमेंटस` हे पाहता सध्या तरी त्यांची भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे दिसते आहे. भाजपच्या नेत्यांना सध्या तरी तात्पुरता दिलासा मिळाला आहे. 

जळगावामधील इतर घटनांबाबत खडसे यांनी सविस्तरपणे पत्रकारांशी मत व्यक्त केले. ते म्हणाले की रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार अल्पवयीन भावंडांच्या निर्घृण हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत 14 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. ही बाब अत्यंत घृणास्पद आहे. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी देखील खडसेंनी केली

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चोऱ्या, हाणामाऱ्या, खून, महिला व युवतींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत मी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पण काहीएक उपयोग झालेला नाही. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे, असा आरोपही खडसेंनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख