गिरीश महाजनांचा सल्ला एकनाथ खडसेंनी मानला.. - Eknath Khadse followed the advice of Girish Mahajan    | Politics Marathi News - Sarkarnama

गिरीश महाजनांचा सल्ला एकनाथ खडसेंनी मानला..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून कार्यकारणीला उपस्थित आहेत.

मुंबई : भाजपा कार्यकारणीच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून कार्यकारणीला उपस्थित आहेत. गेले अनेक दिवस एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरू होती. ते बैठकीत उपस्थित राहणार की नाही, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होत्या.

"भाजप प्रतिकूल परिस्थित्तीत असताना एकनाथ खडसे यांनी पक्षासाठी कार्य केले आहे, पक्षाला मजबूत केलं. आता पक्षासाठी अनुकूल स्थिती असताना त्यांनी पक्ष सोडू नये," असे आवाहन भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काल केले होते.   

खडसे यांच्या पक्षांतरासाठी काहींनी दहा आॅक्टोबर रोजी सकाळी दहाचा मुहूर्त शोधून काढला आहे. प्रत्यक्षात तसे काही नसल्याचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. खडसेंच्या या संभाव्य हालचालींबद्दल भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही आपले मत व्यक्त केले.ते म्हणाले की भाजपला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे खडसे यांनी या स्थितीत भाजप सोडू नये. आता महाजन यांचे हे आवाहन खडसे मनावर घेणार का की गेल्या काही दिवसांची भाजप विरोधातील खदखद प्रत्यक्षात आणणार, यावर येत्या दोन-तीन दिवसांतच निकाल लागण्याची शक्यता आहे.
  
खडसे हे भारतीय जनता पक्षावर नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजीही व्यक्त केली आहे. याच पार्शवभूमीवर ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनीही त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुंबईत जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली होती. 

मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंचा राजीनामा घेतल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केल्यावर खडसेंनीही या जमिनीची खरेदी पत्नी व जावयाने केली आहे, ती नियमानुसारच असल्याचा दावा केला होता. आपल्यावरील अन्यायाबाबत चार वर्षांपासून घरातच धुणी धुतोय, पक्षातच नाराजी व्यक्त करतोय, तिकडून प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मी रस्त्यावर उतरलो, असे खडसे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.

माझ्यावर जे आरोप झाले, त्या कोणत्याही आरोपात जराही तथ्य आढळले, मी दोषी आढळलो तर आतापर्यंत केलेल्या आरोपांबाबत मी भ्रष्ट आहे, नालायक आहे, बदमाश आहे असे कबूल करत उभ्या महाराष्ट्राची हात जोडून माफी मागेन, असेही खडसे म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनेचे नेते व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही ते पक्षात आल्यास त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती"
 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख