खडसेंच्या पुस्तकाचे नाव ठरले : `नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान` - eknath khadase decides name of his upcoming book on fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

खडसेंच्या पुस्तकाचे नाव ठरले : `नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान`

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 सप्टेंबर 2020

खडसे पुस्तकातून कोणता बाॅंबगोळा फोडणार, याची उत्सुकता आहे.

जळगाव :  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या आगामी पुस्तकाचे नाव जाहीर केले असून `नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान`, या नावाने ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान करणार आहेत.       

पेशव्यांचा इतिहास  हा कारस्थानांचा आहे. त्याची पुनरावृत्ती आजही होत आहे. त्याचा त्रास आपल्यालाही झाला आहे. तो आपण `नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान` या पुस्तकातून उघड करणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.

मुक्ताईनगर येथे `जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे` या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, सुधिर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, यांच्या हस्ते ऑनलाईन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. सुनील नेवे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

या वेळी बोलताना खडसे म्हणाले, ``पक्षाचे सर्वच नेते खडसे चांगले आहेत. असे म्हणतात. मग माझे विधानसभा निवडणुकीत तिकीट का कापले, हे मला समजत नाही. त्याचाच शोध मी घेत आहे. आता मला भरपूर वेळ आहे. भाचपची सत्ता आणण्यासाठी मी विरोधी पक्षनेता असतान जीव तोडून प्रयत्न केले. विरोधी पक्षनेता हा मुख्यमंत्री होतो, असे समजले जाते. पण मला ते पद दिले नाही. त्याचे मला वाईट वाटत नाही. पण त्यानंतर माझी राजकीय कारकिर्द संपविण्याचा प्रयत्न झाला. माझ्याविरुद्ध कुभांड रचले गेले. देवेंद्र फडणवीस यांनी मला त्रास दिला.  आमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता. नाथाभाऊ वगळता सर्वांना त्यांनी स्वच्छ केले. माझ्याविरुद्ध खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना मुख्यमंत्री भेटत होते. पण मला वेळ देत नव्हते. कोण कोणाला रात्री भेटत होते, याचे सारे पुरावे आता माझ्याजवळ आहेत. त्यामुळे ते मी सारे मांडणार आहे.

नाथाभाऊ ह अन्याय सहन करणारा नाही. त्याबाबत आपण पक्षाशी भांडत राहणार आहोत. त्याचे उत्तर मागणार आहोत. पक्षाने तुमच्यावर एवढा अन्याय केला मग तुम्ही पक्ष का सोडत नाही, असे मला लोक विचारतात. पण हा पक्ष मी उभा केला आहे. पूर्वी भाजप हा वाणी ब्राम्हणांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. मात्र गोपीनाथ मुंडे,प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर व मी त्याला बाहुजन म्हणून ओळख दिली. पक्षाच्या विरोधात मी कधी बोललो नाही. मात्र फडवणविसांनी त्रास दिला त्यामुळे त्यांच्याविरोधात बोलत राहणार. पक्ष सोडायचा वेळ आली तर जनतेचा कौल घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख