ईडी आरोपीच्या पिंजऱ्यात; सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात धाव - ED approached High Court seeking CBI probe in the case registered | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

ईडी आरोपीच्या पिंजऱ्यात; सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात धाव

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मार्च 2021

सोने तस्करीच्या प्रकरणात मुख्यंमत्र्यांना गोवण्याच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा ईडी अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आला आहे.

तिरुअनंतपुरम : राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोने तस्करीच्या प्रकरणात मुख्यंमत्र्यांना गोवण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप करत केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे ईडी आणि पोलिस आता आमनेसामने आले आहेत. त्यातच आता ईडीने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

केरळमध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोने तस्करीचे प्रकरण गाजत असल्याने सत्ताधारी डाव्या पक्षासमोरील अडचणी वाढू लागल्या आहेत. मागील वर्षी ५ जुलै रोजी केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ व सीमा शुल्क विभागाने तिरूअनंतपुरम विमानतळावर १४ कोटी रुपयांचे ३० किलो सोने जप्त केले होते. हे सोने संयुक्त अरब अमरातीमध्ये पाठविले जाणार होते. या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) स्वप्ना सुरेश हिला अटक केली आहे. तिच्या चौकशीमध्ये मुख्यमंत्री विजयन यांचे प्रधान सचिव एम. शिवशंकर यांचा स्वप्ना सुरेशी संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना पदावरून हटवत निलंबित करण्यात आले.

सीमा शुल्क विभागाने ५ मार्च रोजी केरळ उच्च न्यायालयात थेट मुख्यमंत्री विजयन, त्यांचे तीन मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना सोन्याची तस्करीबाबत माहिती होती, असा दावा केला. स्वप्ना सुरेश हिने आपल्या जबाबात थेट मुख्यमंत्र्यांचे नाव घेतल्याने देशभरात खळबळ उडाली. निवडणुकीच्या तोंडावरच सोने तस्करीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव आल्याने डाव्या आघाडीच्या अडचणी वाढल्या विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय; लोन मोरेटोरियमला मुदतवाढ नाही

त्यानंतर काही दिवसांपूर्वी स्वप्ना सुरेशची एक अॉडिओ क्लीप समोर आली. त्यामध्ये तिने ईडीचे अधिकारी आपल्याला मुख्यमंत्र्यांविरोधात जबाब देण्यास सांगत असल्याचा दावा केला आहे.  तसेच ईडीकडून स्वप्ना सुरेशची चौकशी सुरू असताना तिथे हजर असलेल्या सिजी विजयन या महिला पोलिस अधिकाऱ्याने थेट ईडीवर आरोप केले. स्वप्ना सुरेशवर या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यासाठा ईडीने दबाव टाकल्याचा दावा त्यांनी केला. मागील वर्षी १२ व १३ अॉगस्ट रोजी ईडीने स्वप्ना सुरेशची चौकशी केली होती. 

या प्रकारामुळे राज्य सरकारने ईडीविरोधात पावले टाकण्यात सुरूवात केली होती. अखेर केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी ईडी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कट रचणे, धमकावणे, बनावट कागदपत्रे तयार करणे आधी गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. स्पप्नाशी संबंधित अॉडिओ क्लीपची चौकशी केल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधिक्षक ई. एस. बिजुमोन यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केरळ उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून या गुन्हाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेमुळे आता पोलिस आणि ईडी आमनेसामने आले आहे. ईडीच्या याचिकेवर न्यायालय का निकाल देणार याकडे लक्ष लागले आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख