एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा "जीडीपी' दर तब्बल 23.9 टक्‍क्‍यांनी घसरला - During the April-June quarter GDP fell by 23.9 per cent | Politics Marathi News - Sarkarnama

एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा "जीडीपी' दर तब्बल 23.9 टक्‍क्‍यांनी घसरला

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

कृषीवगळता उत्पादन, बांधकाम आणि सेवा यासह इतर सर्व क्षेत्रांनी तीव्र घसरण नोंदविल्याने देशाच्या एकूण "जीडीपी'ने "रिव्हर्स गिअर' टाकल्याचे दिसून येते.

नवी दिल्ली : "कोविड-19'च्या साथीचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून, यामुळे एकूण देशांतर्गत उत्पादनवाढीच्या दरात (जीडीपी ग्रोथ रेट) आजपर्यंतची सर्वांत मोठी घसरण नोंदली गेली आहे. सततच्या "लॉकडाउन'मुळे अर्थचक्र थंडावल्याने एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा "जीडीपी' दर तब्बल 23.9 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. या घरसणीमुळे मोदी सरकराने आता तरी आर्थिक मुद्यांना प्राधान्य द्यावी, अशी अपेक्षा विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.  

याबाबतची अधिकृत आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली. कृषीवगळता उत्पादन, बांधकाम आणि सेवा यासह इतर सर्व क्षेत्रांनी तीव्र घसरण नोंदविल्याने देशाच्या एकूण "जीडीपी'ने "रिव्हर्स गिअर' टाकल्याचे दिसून येते. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेने 5.2 टक्‍क्‍यांनी प्रगती केली होती, असे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.

 
"कोविड-19'च्या साथीमुळे केंद्र सरकारने 25 मार्च 2020 पासून देशव्यापी "लॉकडाउन' जाहीर केले होते व कालांतराने त्यात सातत्याने वाढ करण्यात आली होती. कारखाने बंद राहिल्याने उत्पादन क्षेत्रातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रातील एकूण मूल्यवर्धित (जीव्हीए) प्रगतीवर विपरीत परिणाम होऊन त्यात 39.3 टक्के घट झाली. गेल्या वर्षीच्या 3 टक्के वाढीच्या तुलनेत ही घसरण लक्षणीय ठरली आहे. तथापि, कृषी क्षेत्राने थोडासा दिलासा दिला आहे. गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीतील 3 टक्‍क्‍यांच्या तुलनेत यंदा "जीव्हीए'मध्ये 3.4 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदली गेली आहे. 

पहिल्या तिमाहीत इतर प्रमुख क्षेत्रात झालेली घसरण पुढीलप्रमाणे ः (कंसात गेल्या वर्षातील वाढ) 
1) बांधकाम क्षेत्र ः सर्वाधिक 50.3 टक्के (5.2 टक्के) 
2) खाणकाम क्षेत्र ः 23.3 टक्के (4.7 टक्के) 
3) वीज, गॅस, पाणीपुरवठा आणि इतर सेवा क्षेत्र ः 7 टक्के (8.8 टक्के) 
4) व्यापार, हॉटेल, वाहतूक, दूरसंचार व प्रक्षेपणसंबंधी सेवा क्षेत्र ः 47 टक्के (3.5 टक्के) 
5) आर्थिक, रिअल इस्टेट व व्यावसायिक सेवा क्षेत्र ः 5.3 टक्के (6 टक्के) 
6) सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवा क्षेत्र ः 10.3 टक्के (7.7 टक्के) 

विविध वित्तीय संस्थांनी भारताच्या "जीडीपी'च्या दराविषयी यापूर्वीच घसरणीचे चिंताजनक अंदाज वर्तविले होते. 

"जीडीपी' म्हणजे काय? 
-------------------- 

देशाच्या अर्थव्यवस्थेची तब्येत कशी आहे, याचे मोजमाप करण्याचे जे निकष आहेत, त्यात "जीडीपी'चे स्थान महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही देशात रोज असंख्य आर्थिक व्यवहार होत असतात. पण याची नोंद ठेवण्यासाठी देशाने एका आर्थिक वर्षात किती मालाचे उत्पादन केले व किती सेवा पुरविल्या, याची आकडेवारी मांडणे आवश्‍यक असते. विविध संस्था या कामांत कार्यरत असतात. आर्थिक वर्षात देशाने जो माल तयार केला व सेवा दिल्या, त्यांना प्राथमिक (शेती आदी), दुय्यम क्षेत्र (उद्योग, व्यवसाय आदी) व सेवा क्षेत्र यांत विभागले जाते. अशा वार्षिक उत्पादनाला बाजारी किमतीने गुणले, की जे उत्तर येईल ते म्हणजे "ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्‍ट (जीडीपी)' अर्थात एकूण देशांतर्गत उत्पादन! "जीडीपी'ची वाढ हा कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीचा मापदंड असतो. "जीडीपी' वाढीचा दर चांगला असेल, तर देशाची अर्थव्यवस्था प्रगती करीत आहे, नागरिकांना चांगले उत्पन्न मिळत आहे, बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे, औद्योगिक उत्पादनाला चांगला उठाव आहे, सेवा क्षेत्रातही चांगली मागणी दिसून येत आहे, असा त्याचा अर्थ होतो. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख