होय, या कारणांमुळे खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशासाठी घटस्थापनेचा मूहूर्त टाळला.... - due to these reasons eknath khadse avoids joining of congress | Politics Marathi News - Sarkarnama

होय, या कारणांमुळे खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशासाठी घटस्थापनेचा मूहूर्त टाळला....

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खडसे यांच्या प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्षच सांगू शकतील, अशी माहिती दिली.

जळगाव : भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे मुहूर्त आपले नव्हे तर ते माध्यमांचे आहेत, असे वक्तव्य करत पुन्हा आपली झाकली मूठ कायम ठेवली आहे. खडसेंच्या या मूहूर्तावर माध्यमांमधूनच सर्वाधिक चर्चा झाली. यावर अधिकृतरित्या ना खडसे बोलले ना राष्ट्रवादीच्या कोणी नेत्यांनी यावर काही भाष्य केले.

खडसे हे भाजप सोडणार, हे त्यांचे समर्थक छाती ठोकून सांगत आहेत. माजी आमदार उदेसिंह पाडावी यांनी तर खडसेंनीच आपल्याला राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला आणि मी पण मागून येणार असल्याचे मला सांगितले, असा दावा केल्याने खडसेंच्या पक्षप्रवेशावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले. त्यात माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस हे जळगावातील जामनेरमध्ये असतानाही खडसेंनी त्यांची भेट घेतली नाही, यावरून खडसेंनी आपण भाजपच्या नेत्यांशी बोलणार नसल्याचा संदेश दिला. खडसेंना राष्ट्रवादीत कोणते खाते मिळणार आणि त्यासाठी राष्ट्रवादीच्या कोणत्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार, यावरही माध्यमांनी अंदाज बांधले. मग खडसे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय का टाळला, याची आता कारणे शोधली जात आहेत.

त्यातील प्रमुख कारणे सांगता येतात ती पुढीलप्रमाणे

1) भाजपकडून आपले राजकीय पुनर्वसन होईल, अशी खडसेंना अद्याप आशा असावी. त्यामुळेच ते केवळ दबावाचे राजकारण खेळत असावेत. आपण इतर पक्षांत जाणार हे सांगून भाजपवर दबाव टाकण्याचा तर खडसेंचा हेतू नसावा ना?

2)एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा या भाजपच्या खासदार आहेत. त्यांचा भाजप सोडायला विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे देखील खडसे द्विधा मनस्थितीत असावेत.

3) रक्षा खडसे यांचा भाजपच्या खासदारकीचा राजीनामा घ्यावा आणि त्यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी घेत तेथे पोटनिवडणूक घ्यावी, असा राष्ट्रवादीतील काहींना वाटते आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी तसे करण्याची गरज नाही, असे सांगितले असल्याचा दावा केला जात आहे.

4)राष्ट्रवादी खडसेंना विधान परिषदेवर तातडीने घेणार, हे जरी ठऱले असे सांगण्यात येत असले तरी मंत्रीपद कधी देणार, यावर निश्चिती नसल्याचे बोलले जात आहे. नुसत्या आमदारकीसाठी भाजपची नाळ तोडावी का, यावरही ते विचार करत आहेत. राज्यपाल कोट्यातून खडसेंच्या नावाची शिफारस केली जाणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यात काही खेळ करण्याची शंका नाकारता येत नाही. 

5)महाविकास आघाडी सरकार सत्तेत किती दिवस राहील, याबाबत खडसे साशंक आहेत का? त्यामुळे ते पण द्विधी मनःस्थितीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी  (ता. १७) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र आज खडसे यांनीच याबाबत नकार दिला आहे.जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत आपण कोणताही मुहूर्त सांगितला नाही. हे सर्व मुहूर्त माध्यमांनी काढले आहेत. या प्रवेशाच्या बाबत मला काहीही बोलावयाचे नाही. त्याबाबत आपले `नो कॉमेंट्स` असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

खडसेंच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा राजकीय चर्चा सुरू होऊन ते पुढे काय करणार, याची अंदाजबांधणी सुरूच राहणार आहे. खडसे यांच्या संदर्भात तीन विविध प्रमुख नेत्यांनी वक्तव्ये केली. भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी खडसे हे भाजप सोडणार नसल्याचा दावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खडसे यांच्या प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्षच सांगू शकतील, अशी माहिती दिली.

या साऱ्या नेत्यांच्या वक्तव्ये आणि त्यावर खडसे यांचे `नो काॅमेंटस` हे पाहता सध्या तरी त्यांची भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे दिसते आहे. भाजपच्या नेत्यांना सध्या तरी तात्पुरता दिलासा मिळाला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख