पंकजा मुंडे या शिवसेनेत जाणार... ही चर्चा त्यांच्याच एका वाक्याने सुरू झाली - due to this sentence rumors start that pankja munde would join shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडे या शिवसेनेत जाणार... ही चर्चा त्यांच्याच एका वाक्याने सुरू झाली

महेश जगताप
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

पंकजा मुंडे या नेहमी सूचकपणे राजकीय संदेश देतात. त्याचे अनेक अर्थ निघतात आणि तसे निघावेत, असा त्यांचाही हेतू असतो. 

पुणे : शिवसेनेचा कोणताही नेता, प्रवक्ता भेटला की सध्या त्याला एकच प्रश्न त्यांना विचारला जातो... तो म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या शिवसेनेत येणार का आणि शिवसेनेतर्फे राज्यपाल कोट्यातून त्या आमदार होणार का? शिवसेनेचे प्रवक्ते हा प्रश्न टोलवतात किंवा याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील, असे सांगून वेळ मारून नेतात. या साऱ्या चर्चेचे मूळ हे खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशात, पंकजांच्या नाराजीत आणि त्यांच्या एका वाक्यात आहे.

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर मुंडे या देखील भाजपला सोडिचिठ्ठी देणार असल्याची चर्चा जोरात होती. पण काही माध्यमांनी थेट त्यांना राज्यपाल कोट्यातून शिवसेना आमदार करणार असल्याच्या बातम्या दिल्या. त्यांचे समर्थकही खडसेंनी भाजप सोडला, आता तुम्हीही सोडा, अशा सूचना सोशल मिडियात देऊ लागले. भाजप हा आता ओबीसींचा राहिला नाही, असा सारा सूर त्यात होता.

विधानसभेतील निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा यांनी थेट राजकीय भाष्य काही केले नाही. त्यांनी अनेक ट्विट केले ते सूचक पद्घतीने! शिवसेनेशी आपली जवळीक दाखविण्यासाठी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कामाचे पंकजांनी कौतुक केले. भाजपचे इतर नेते हे महाविकास आघाडीवर आणि विशेषतः शिवसेनेवर तुटून पडत असताना मुंडे या टीका तर सोडाच पण त्यांच्या कामाची प्रशंसा करून राजकीय गोंधळ उडवून देत होत्या.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त 12 डिसेंबर 2019  रोजी मोठा मेळावा घेतला. खडसेही या मेळाव्याला उपस्थित होते. त्या मेळाव्याची अशी हवा झाली होती की पंकजा या भाजपच्या त्यागाची घोषणा करतात की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे त्या मेळाव्यात सहभागी होऊन पंकजांचे भाजपशी बंध कायम असल्याचा संदेश दिला.

पंकजा यांनी त्याच कार्यक्रमात मराठवाड्याच्या पाणीप्रश्नासाठी उपोषण करण्याचे आणि मुंबईत आपले कार्यालय सुरू करणे, अशा दोन घोषणा केल्या. त्यातील दोन्ही बाबी पूर्ण झाल्या. आपली राजकीय ताकद त्यांनी दाखवून दिली. त्यानंतर त्या भाजपच्या कोणत्याच कार्यक्रमाला फारशा उपस्थित राहत नव्हत्या पण खडसे यांच्याप्रमाणे पक्षाच्या किंवा नेत्यांच्या विरोधात जाहीर वक्तव्य करत नव्हत्या. विधान परिषदेवर पाठवायच्या नावांत खडसे, मुंडे यांचा समावेश नव्हता. त्यावरही खडसेंनी थयथयाट केला. ते टाळून मुंडे यांनी सूचकपणे आपली नाराजी व्यक्त केली.  भाजप त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी देणार असल्याचे जाहीर करून चंद्रकांत पाटील यांनी मुंडेंची नाराजी कमी होईल, याकडे लक्ष दिले. त्या राष्ट्रीय सचिव झाल्या. आपण पक्षातच राहणार असल्याचे वारंवार स्पष्ट करूनही त्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चाही कायम राहिली.

विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून आमदार नेमण्याची चर्चा आॅक्टोबरमध्ये पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यातही मुंडेंच्या नावाची शिवसेना शिफारस करणार असल्याचे बोलले जाऊ लागले. त्याला महत्त्वाचे कारण हे यंदाच्या दसरा मेळाव्यातील त्यांचे एक वाक्य ठरले. यंदाचा दसरा मेळावा आॅनलाईन झाला. गोपीनाथ गडावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी भाषण केले. (याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला.) हे भाषण करताना आपल्याला एक दिवस शिवतीर्थ गर्दीने भरवायचे आहे, असे वाक्य उच्चारले. पंकजा यांचा दसरा मेळावा आणि भगवानगड, असे समीकरण होते. भगवानगडावर मेळावा घेण्यात अडचणी आल्यानंतर त्यांनी तो सावरगाव येथील भगवान भक्तीगडावर घेण्यास सुरवात केली. मुंबईतील शिवतीर्थ आणि शिवसेना यांचा घनिष्ठ संबंध आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा येथेच भरतो. शिवसेनेच्या शिवतीर्थावर पंकजांना मेळावा का घ्यायचा आहे, याचे उत्तर त्यांच्या समर्थकांनी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून पंकजांना सेनेच्या वाटेवर जायचे आहे. शिवबंधन बांधायचे आहे, असा अर्थ घेतला गेला.

सेना नेतृत्त्वाची आणि त्यांची थेट भेट झाल्याचे अद्याप तरी माध्यमांना कळालेले नाही. त्यामुळे खरेच काही असे पंकजांच्या आणि सेना नेतृत्त्वाच्या मनात आहे का, याची चर्चा विधान परिषेदवर बारा आमदार नेमले जात नाहीत, तोपर्यंत सुरूच राहणार आहे.  राजकीय संदेश देण्यात पंकजा वाकबगार आहेत. भाजपवर नाराज असल्याचे अशा वक्यव्यांतून त्या दाखवून देतात. शिवतीर्थावर मेळाव्याचे वक्तव्य हे नाराजी व्यक्त करणारे आहे की भविष्यातील राजकीय धोरण आहे, यावर त्यामुळेच चर्चा होतच राहणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख