गृहमंत्र्यांचा सचिव संजीव पलांडेही पोलिस अधिकाऱ्यांना कलेक्शनचा आकडा सांगयचा? - does personal secretary of HM Sanjay Palande told amount of Hafta is the question | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्र्यांचा सचिव संजीव पलांडेही पोलिस अधिकाऱ्यांना कलेक्शनचा आकडा सांगयचा?

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 20 मार्च 2021

वाझे प्रकरणामुळे अनेक बाबी पुढे आल्या...

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्या लेटरबाॅम्बने खळबळ उडाली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिव वाझेकडून महिन्याला सुमारे शंभर कोटी रुपये हप्त्याची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपाचा अनिल देशमुख यांनी तातडीने इन्कार केला असून वाझे प्रकरणाची धग त्यांच्यापर्यंत पोहोचू लागल्यानेच ते असा आरोप करत असल्याचा पलटवार केला आहे.

परमबीरसिंह यांनी आठ पानी पत्र लिहिले असून त्यात  वाझेला बोलावून मंत्र्यांनी त्याला कसे हफ्ते गोळा करायला सांगितले, हे सविस्तर लिहिले आहे. याबाबत झालेल्या बैठकांना गृहमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे हे पण उपस्थित होते, असा उल्लेख परमबीरसिंह यांनी केला आहे. सामाजिक सुरक्षा शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सतिश पाटील आणि उपायुक्त दिलीप भुजबळ यांना देशमुखांनी त्यांच्या बंगल्यावर बोलून घेतले होते. त्या वेळी पलांडे पण हजर होते. मुंबई शहरातील एकूण हुक्का पार्लरची संख्या पाहता त्यांच्याकडून 50 कोटी रुपये महिन्याला मिळायला हवेत, असा गृहमंत्र्यांचा निरोप पलांडे यांनीच भुजबळ आणि पाटील यांनी दिल्याचे पत्रात म्हटले आहे.

पलांडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील मुखई येथील आहेत. त्यांचे वडील हे सूर्यकांत पलांडे हे माजी आमदार आहेत. शरद पवार यांच्या समाजवादी काॅंग्रेसमधून ते 1980 मध्ये आमदार झाले. अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. पलांडे यांनी या आधीचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांचा तेथील अनुभव पाहूनच देशमुखांनी त्यांना घेतले होते. परमबीरसिंह यांनी त्यांच्या आठ पानी पत्रात बऱ्याच वेळा पलांडे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.  

ही बातमी वाचा : काय आहे परमबीरसिंह यांच्या पत्रात?

असे ठरले टार्गेट

वाझेंना महिन्याला 100 कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत 1 हजार 750 बार,  रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून 40 ते 50 कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांना जमा करावेत, असे त्यांनी सांगितले, असा आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. 

अँटिलिया प्रकरणाची माहिती देण्यासाठी या महिन्यातच मी वर्षा बंगल्यावर तुम्हाला भेटलो होतो. त्यावेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट  आणि चुकीच्या कामांबद्दल माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांच्या कानावरही मी हे घातले होते. काही मंत्र्यांना हे आधीपासून माहिती असल्याचे त्यावेळी मला लक्षात आले होते, असा दावाही परमबीरसिंग यांनी केला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख