गृह विलगीकरणात आहात...मग अशी घ्या काळजी! 'एम्स'मधील डॅाक्टरांनी दिला सल्ला - Doctors at AIIMS told how to be careful in home isolation | Politics Marathi News - Sarkarnama

गृह विलगीकरणात आहात...मग अशी घ्या काळजी! 'एम्स'मधील डॅाक्टरांनी दिला सल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 16 मे 2021

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्णांना अतिसौम्य लक्षणे आढळून येतात. या रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला जातो.

नवी दिल्ली : खोकला, ताप, गंधहीन, चव जाणे अशी कोरोनाची सर्वसाधरण लक्षणे आहेत. काहींना डोकेदुखी, अतिसार, घसा खवखवणे अशी लक्षणे आढळून येतात. त्यानंतर अनेक जण लगेच कोरोनाची चाचणी करतात. पण काहींच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह येतो. प्रामुख्याने रॅपिड अॅन्टीजेन चाचणीमध्ये हा अहवाल निगेटिव्ह येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लक्षणे असूनही चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास पुन्हा चाचणी करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॅाक्टरांनी दिला आहे. (Doctors at AIIMS told how to be careful in home isolation)

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्णांना अतिसौम्य लक्षणे आढळून येतात. या रुग्णांना गृह विलगीकरणाचा सल्ला दिला जातो. पण घरी राहून कशी काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने 'गृह विलगीकरणातील औषधे आणि घ्यावयाची काळजी' या विषयावर वेबिनार घेण्यात आले. यामध्ये दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॅा. मनीष व डॅा. नीरज निश्चिल यांनी माहिती दिली. 

हेही वाचा : कोव्हॅक्सिन लशीचा डोस 'डबल म्यूटंट' कोरोनाचा ठरतोय कर्दनकाळ

कोविड चाचणी केल्यानंतर निगेटीव्ह आली असेल आणि तरीही लक्षणे दिसून येत असतील, तर पुन्हा चाचणी करायला हवी. पॉझिटीव्ह रुग्णांना त्यांच्या आजाराच्या तीव्रतेनुसार रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे,  असे डॉ. नीरज निश्चल म्हणाले, कोरोना काळात योग्य औषध योग्य वेळी घेतल्यास रुग्णांना खरा लाभ होतो. साठ वर्षांवरील रुग्ण, उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयाचे विकार, किडनी, फुप्फुसाचे विकार असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच गृह विलगीकरणाचा निर्णय घ्यायला हवा. रुग्णांनी नियमित लागणारी औषधे, निर्जंतुकिकरणासाठीच्या वस्तू, वैद्यकीय दर्जाचे मास्क आणून ठेवणे गरजेचे आहे. घरात रोज लागणाऱ्या सामानासाठी नियोजन करणे, डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, ऐन वेळी लागणाऱ्या मदतीसाठी कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार, शेजारी यांचे संपर्कही असावेत, असे डॉ. नीरज यांनी सांगितले.

डॉ. मनीष यांनी सांगितले की, ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा कमी झाल्यास लगेच रुग्णालयात दाखल व्हावे. ऑक्सिजन पातळी तपासण्यासाठी रुग्णाचे वय, पुर्वीचे आजार लक्षात घेणे आवश्यक आहे. आयव्हरमेक्टीन देण्याविषयीचा निर्णय हा रुग्णांची प्रतिकारशक्ती, इतर बाबी यावर अवलंबून असते. तीच बाब पॅरासिटेमोल बाबतही आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियमावलीत फॅबीफ्लू घेण्याविषयी सांगण्यात आले आहे. ग्लेनमार्कने 150 रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर फॅबीफ्लूची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, यातून आयव्हरमेक्टीन वगळण्यात आले आहे. अनेकदा रुग्णांकडून अझिथ्रोमायसीनची मागणी केली जाते. मात्र,  या गोळ्या वापरु नका, असे नियमावलीत सांगितले आहे. अशीच सूचना रेविडॉक्स बाबतही आहे. 

अशी घ्या काळजी...
- कोरोनाबाधित रुग्णांनी कुटुंबातील सदस्यांपासून वेगळे राहावे 
- गरजेची औषधे जवळ बाळगावी- डॉक्टरांसोबत नियमित संवाद साधावा
- नियमितपणे तीन पदरी मास्क वापरावा
- रुग्णाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने N-95 मास्क वापरावा                                  - घरी रेमडेसिवीरचा वापर घरी करु नये 
- नियमित व्यायाम करावा                                                                                - पल्स ऑक्सिमीटरवर नियमितपणे अॅाक्सीजन पातळी तपासावी

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख