... म्हणे काल झालेली नीट परीक्षाच रद्द करा, डीएमकेसह कॉंग्रेसची अजब मागणी  - dmk congress demanding that NEET exam be scrapped.demond | Politics Marathi News - Sarkarnama

... म्हणे काल झालेली नीट परीक्षाच रद्द करा, डीएमकेसह कॉंग्रेसची अजब मागणी 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

नीटमध्ये अपयश येईल म्हणून तमिळनाडूतील अकरा विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपविले याकडेही डीएमकेच्या खासदारांनी मोदी सरकारचे लक्ष वेधले आहे. 

नवी दिल्ली : ओरिसा, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केंद्राकडे केली होती पण, ही मागणी धुडकावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्याने त्यांनी परीक्षा घेण्याचा आदेश दिला होता त्यानुसार काल (ता.13) देशभर नीटची परीक्षा पार पडली. मात्र कालच्या परीक्षेचे पडसाद आज दिल्लीत उमटलेच. 

ही परीक्षाच रद्द करावी अशी मागणी विशेषत: तमिळनाडूनतील डीएमकेने केली आहे. या मुद्यावर पक्षाचे खासदार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. तमिळनाडूमध्ये डीएमकेच्या आमदारानीही या मुद्यावरून तेथील अण्णाद्रमुक पक्षाला धारेवर धरले आहे. काही आमदारांनी विधिमंडळात मास्क घालू बॅन नीटचे पोस्टर्स घेऊन निषेध व्यक्त केला. 

नीट परीक्षेच्या भितीने आतापर्यंत सोळा सतरा वर्षाच्या बारा मुलांनी आत्महत्या केल्या आहेत याकडेही डीएमकेच्या आमदार आणि खासदारांनी लक्ष्य वेधले आहे. कोरोनाच्या संकटामुळे आम्ही वारंवार केंद्राकडे मागणी करीत होतो की ही परीक्षा पुढे ढकला मात्र आमचा आवाज सरकारने ऐकला नाही असा डीएमकेच्या खासदारांनी केला आहे. संसदेच्या आवारात डीएमकेच्या खासदार नीट रद्द करा या मागणीसाठी निदर्शने केली आणि सरकारचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. 

डीएमके आणि डाव्या पक्षाने सरकारविरोधात स्थगनप्रस्ताव आणण्याची नोटीसही दिली आहे. डीएमके आणि डाव्या पक्षाच्या मदतीला कॉंग्रेसने धाव घेतली आहे. या पक्षाचे संसदेतील गटनेते अधिर रंजन चौधरी यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना बारावी परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत.

मात्र त्यांना काही कारणाने नीट परीक्षेची तयारी करता आली नाही. त्यांनी खासगी क्‍लासेसमध्ये जाता आले नाही. नीटमध्ये अपयश येईल म्हणून तमिळनाडूतील अकरा विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपविले याकडेही डीएमकेच्या खासदारांनी मोदी सरकारचे लक्ष वेधले आहे. 

दरम्यान, ओरिसा आणि पश्‍चिम बंगाल राज्यात काही महिन्यापूर्वी महापूर आला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शाळा महाविद्यालये बंद होती. त्यात कोरोनाचे संकट होते. तसेच महाराष्ट्रात कोरोनाचा कहर होता त्यातच निसर्ग वादळाचा तडाखा राज्याला बसला होता या सर्व पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नीट परीक्षा पुढे ढकलावी आणि व्यक्तीशा आपण लक्ष घालावे अशी मागणी केली होती. 

तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही पंतप्रधानांकडे नीट पुढे ढकलण्याची मागणी केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते मात्र न्यायालयाने ठरलेल्या वेळेनुसार म्हणजे 13 सप्टेबररोजी नीट परीक्षा होईल असा निकाल दिला होता.

त्यानुसार या परीक्षा झाल्या आहेत. आता परीक्षा झाल्या असताना डीएमकेने ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली आहे त्याला परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विरोध आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख