दिवाळी विशेष : "समाजोपयोगी कामे राजकारणाच्या माध्यमातूनही करता येतात : मंजुषा देशमुख 

भविष्यात संधी मिळाली तर पुन्हा एकदा नगराध्यक्ष व्हायला मला आवडेल. त्यानंतर केवळ शहराचेच नाही तर तालुक्याचे प्रतिनिधित्व करायची देखील माझी इच्छा आहे.
02.png
02.png

भोकरदन (जि. जालना) : विदर्भातल्या पुसद सारख्या शहरात शिक्षण घेतल्यानंतर घरी माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. भोकरदन येथील देशमुख या राजकीय घराण्यात सोयरीक जुळली. सासरे औरंगाबादचे खासदार होते. तर पती देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात सक्रिय होते. शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला असला तरी घरात देखील राजकीय वातावरण होते. पण खऱ्या अर्थाने राजकारणात येण्याची आणि काम करण्याची संधी मिळाली ती विवाहानंतरच. राजकीय घराण्यात सून म्हणून जाणार म्हटल्यावर भविष्यात आपल्यालाही राजकारणात जावे लागेल याची कल्पना होती. तशी मानसिक तयारी देखील केली. 

पती राजाभाऊ देशमुख स्वतः अनेक वर्ष नगराध्यक्ष राहिलेले. त्यांचा राजकीय अनुभव आणि जनसंपर्क दांडगा होता. ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि भोकरदन शहराची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला. चार वर्षापुर्वी पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली आणि जनतेने भरभरून आशीर्वाद देत काम करण्याची संधी दिली. मिस्टरांची खंबीर साथ आणि लोकांनी दाखवलेला विश्वास यामुळे निश्चितच जबाबदारी वाढली होती. 

जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचे दडपण होतेच, पण मिळालेल्या संधीच सोनं करायचं आणि शहराची प्रथम नागरिक म्हणून पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता या मूलभूत गरजांची पुर्तता करायची हा ध्यास घेऊन कामाला सुरुवात केली. आज चार वर्षानंतर जेव्हा मागे वळून पाहते, तेव्हा निश्चितच या काळात केलेल्या कामाचे समाधान वाटते. 

स्वच्छतेसाठी मिळालेला पुरस्कार प्रेरणादायक.. 

नगराध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली तेव्हा प्रामुख्याने पाणी आणि स्वच्छता या समस्या सोडवण्यावर सर्वाधिक भर दिला. महिला नगराध्यक्ष असल्याने शहरातील स्त्रीया हक्काने या समस्या घेऊन माझ्याकडे यायच्या. मी देखील काळजीपूर्वक ऐकून घेऊन त्या सोडवण्याचा सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केला. नगरपालिकेतील माझे सगळ्या पक्षाचे सहकारी, प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे नुकताच आमच्या नगरपालिकेचा स्वच्छता अभियानाच्या मोहिमेत विभागात ३५ वा क्रमांक आला. अडीच कोटी रुपयांचे बक्षीस देखील नगरापालिकेला मिळाले. आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना मिळालेली ही एक प्रकारची पावतीच होती. यातून शहरातील नागरिकांसाठी आणखी चांगली कामे करण्याची प्रेरणा निश्चितच मिळाली. 

शहराची हद्द वाढल्यानंतर नवीन वसाहतीला मुबलक पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान होते. त्यासाठी नवीन जलवाहिनी टाकून हा प्रश्न देखील सोडवला. नळाला पाणी आल्यानंतर या भागातील लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून निश्चित समाधान वाटते. शहरातील रस्ते, त्यांची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती, पथदिवे या गोष्टींवर भर देऊन या सेवा नागरिकांना निरंतर मिळाव्यात, त्यात कुठलाही व्यत्यय येऊ नये, याची नगराध्यक्ष म्हणून मी व्यक्तीशः काळजी घेते. शेवटी नागरिकांनी दिलेल्या कराचा मोबदला त्यांना उत्तम व चांगल्या प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवणे हे नगराध्यक्ष म्हणून माझे कर्तव्य आणि करदाते म्हणून त्यांचा तो अधिकार आहे, असे मी समजते. 

कोरोना रोखण्यात यश, वैयक्तिक मदतीतून दिलासा.. 
यंदाच्या वर्षाचे सुरुवातीचे काही महिने सुरळीत गेल्यानंतर मार्च महिन्यात अचानक जग, देश, राज्य आणि अगदी तालुका, ग्रामीण भागाला देखील एका नव्या अशा जागतिक महामारीच्या संकटाचा सामना करावा लागला. एक नव्हे दोन नव्हे चक्क सहा महिने लॅाकडाउनमध्ये राहावे लागले. इतिहासातील ही बहुधा पहिलीच वेळ असेल. सुरुवातीला शहरी भागात प्रभाव असलेल्या कोरोना संसर्गाचा फैलाव ग्रामीण भागात देखील झाला. अगदी मी राहत्या त्या भागात कोरोनाचे काही रुग्ण आढळले आणि आमची चिंता वाढली. 

नगराध्यक्ष म्हणून शहरातील नागरिकांचे या महामारीपासून रक्षण करणे याला सर्वोच्च प्राधान्य देत आम्ही तातडीने पावले उचलली. प्रशासन, आरोग्य विभाग, नगपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. शहराचे निर्जंतुकीकरण, घरोघरी जाऊन तपासणी, लक्षणे दिसताच त्यांच्यावर उपचार, मास्क, सॅनिटायझरचे वाटप करून ते वापरण्याचे आवाहन करतांनाच कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी घेतलेला जनता कर्फूयचा निर्णय योग्य ठरला. आज भोकरदन शहर कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. 

संसर्ग कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही, याची जाणीव असल्याने नगरपालिका अत्यंत सतर्कपणे काम करत आहे. शहरातील कचरा नियमितपणे उचलला जातो की नाही, घंटा गाडी घरोघरी जाते की नाही, याकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांचा आढावा घेतला आणि घेत आहे. नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असतांनाच लॅाकडाउनमुळे व्यवसाय बुडालेले छोटे मोठे दुकानदार, हातावर पोट असणारे गोर-गरीब गरजू कुटुंब यांची होणारी फरफट मी बघितली. अनेक कुटुंबांना तर दोनवेळच्या अन्नाची भ्रांत होती. 

सामाजिक बांधीलकी आणि माणुसकीच्या दृष्टीने या सगळ्या गरजूंना मदत करण्याची तळमळ होती. सरकारी मदत मिळत असली तरी ती पुरेशी नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ येऊ लागली. तेव्हा अन्न-पाण्यावाचून एकही कुटुंब राहता कामा नये, या भावनेतून शहरातील पाच हजार गरीब कुटुंबांना अन्न-धान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू पुरवून काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या कामी पती राजाभाऊ देशमुख, काँग्रेस कार्यकर्त्यांची मोलाची साथ मिळाली. पन्नासहून अधिक गाळेधारकांना दोन महिन्यांचे भाडे माफ करत या संकटाच्या काळात त्यांनाही मदतीचा हात दिला. यातून मिळालेले आत्मिक समाधान खूप मोठे होते. 


शैक्षणिक संस्थेकडेही लक्ष.. 

राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करत असतांनाच जनविकास शिक्षण संस्थेची कोषाध्यक्ष म्हणून मी येणाऱ्या नव्या पिढीच्या शिक्षणात देखील लक्ष देते. मला त्याची आवड देखील आहे. आज आमच्या संस्थेत बीवसशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. सीबीएससी आणि स्टेट बोर्ड अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण मुलांना दिले जाते. बौद्धिक विकासा सोबतच शारीरिक विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील कुठल्याही संकटाला धीरोदात्तपणे सामोरे जाण्याचा आत्मिश्वास या नव्या पिढीमध्ये जागवण्याचे काम आमची संस्था शंभरहून अधिक सक्षम शिक्षकांच्या माध्यमातून सातत्याने करते आहे. 

वेळ मिळेल तेव्हा शाळेत जाणे, तिथल्या अडीअडचणी सोडवून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे वातावरण आणि शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्न करते. त्यामुळे आमच्या संस्थेत शिक्षण घेऊन गेलेले अनेक विद्यार्थी आज आयआयटी, इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आहेत. नुकत्याच झालेल्या नीट परिक्षेत देखील आमच्या संस्थेतील काही विद्यार्थांनी यश संपादन केले आहे. 

समाजातील सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना चांगले व उच्चशिक्षण मिळाले पाहिजे असे मला सतत वाटते. आर्थिक परिस्थितीमुळे एखादा होतकरू विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी आम्ही दरवर्षी माझे सासरे दिवंगत भाऊसाहेब देशमुख यांच्या नावाने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील देतो. याचा लाभ आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना झाला आहे. 

वाचन, पाक कलेची आवड.. 
राजकारण आणि त्या माध्यमातून समाजसेवा करताना समर्पित भावनेने काम करावे लागते. सहाजिकच त्यासाठी सातत्याने जनतेशी संपर्क, नागरी प्रश्न सोडवण्यासाठी बैठका, दौरे या गोष्टी आल्याच. शिवाय पती राजाभाऊ देशमुख हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांच्यावर देखील मोठी जबाबदारी आहे. कामाचा शीण आला तरी त्याचा कंटाळा कधी आला नाही. शारीरीक आणि मानसिक थकवा घालवण्यासाठी वाचन, पाक कला यात देखील मी वेळ घालवते. 

नवनवे पदार्थ तयार करणे आणि ते खाऊ घालणे याची मला खूपच आवड आहे. या शिवाय पर्यटन हा माझ्या आवडतीचा विषय. वर्षातून एकदा तरी आम्ही सगळे कुटुंबीय पर्यटनाला जाऊन येतोच. मी आणि माझे पती दोघेही राजकारणात सक्रिय असलो तरी यातून वेळ काढून कधी पर्यटनाला तर कधी नाटक, सिनेमा पहायला जातो. यातून शारीरिक थकवा, ताण नाहीसा होण्यास तर मदत होतेच, पण नवी ऊर्जा घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचे बळ देखील मिळते. 

नव्या पिढीने राजकारणात यावे.. 

राजकारण्यांना नावे ठेवणे, त्यांच्याबद्दल वाईट बोलणे ही आज एक फॅशन झाली आहे. पण हे म्हणजे नदीच्या काठावर बसून पाण्यात दगड मारण्यासारखे आहे, असे मला वाटते. हेतू शुध्द असेल आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तळमळीने काम करण्याची जिद्द असले तर तुम्हाला राजकारणात भरपूर वाव आहे. आजची तरुण पिढी खूप हुशार आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी आहे. महिलांना तर राजकारणात खूप काही करण्यासारखे आहे. इंटरनेट, डिजिटल गॅझेटच्या माध्यमातून जग खूप जवळ आले आहे. त्याचा योग्य आणि समाजोपयोगी कामांसाठी वापर केला तर निश्चित आपण चांगले काम करू शकतो, याचा अनुभव मी स्वतः घेत आहे. त्यामुळे महिलांनी विशेषतः राजकारणात यायलांच हवं. त्यासाठी शिक्षण, अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य या जमेच्या बाजू ठरू शकतात. 

त्यामुळे मी माझ्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत अधिक जागृत राहिले. माझी मुलगी आमच्या तालुक्यातील पहिली सीए (चार्टंड अकाउंटंट) ठरली. माझ्या मुलाने देखील इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. सध्या तो बंगलोर येथे एमबीएचे शिक्षण घेत आहे. मुलगी सासरी तिच्या व्यवसायत व्यस्त आहे. मुलाने आमचा राजकीय वारसा चालवावा आणि राजकारणात यावे, अशी आमची इच्छा आहे. पण आम्ही त्याच्यावर इच्छा लादणार नाही. त्याला आवड असेल तर त्याने निश्चित राजकारणात यावे. 

संधी मिळाल्यास पुन्हा निवडणूक लढवेन.. 

राजकारणात कधी रिटायर्टमेंट नसते, असे उपहासाने म्हटले जाते. पण समाजाची सेवा, लोकांची कामे करून जे समाधान मिळते ते शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही. हंडाभर पाण्यासाठी अनवाणी पायाने करावी लागणारी वणवण, जेव्हा घरासमोरील नळाला पाणी आल्यावर थांबते, तेव्हा त्या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद कुठल्याही किमतीत मोजता येत नाही. अशी अनेक सर्वसामान्यांना आनंद देणारी आणि स्वतःला आत्मिक समाधान वाटावी अशी समाजोपयोगी कामे राजकारणाच्या माध्यमातून करता येऊ शकतात. नगराध्यक्ष म्हणून मी याचा अनुभव गेल्या चार वर्षापासून घेते आहे. 

भविष्यात संधी मिळाली तर पुन्हा एकदा नगराध्यक्ष व्हायला मला आवडेल. त्यानंतर केवळ शहराचेच नाही तर तालुक्याचे प्रतिनिधित्व करायची देखील माझी इच्छा आहे. अर्थात ते येणारा काळच ठरवेल. पण संधी मिळाली तर निश्चितच तिचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास मात्र मी नक्कीच देऊ शकते. 

(शब्दांकन : जगदीश पानसरे)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com