राणेंसाठी हद्दपारीची वक्‍तव्ये जुनीच... जनतेनेच त्यांना केले चारवेळा हद्दपार.. सावंतांचा टोला - District Bank Chairman Satish Sawant criticizes Narayan Rane | Politics Marathi News - Sarkarnama

राणेंसाठी हद्दपारीची वक्‍तव्ये जुनीच... जनतेनेच त्यांना केले चारवेळा हद्दपार.. सावंतांचा टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

दुसऱ्यांवर टीका व दोष दाखविणे हा एकमेव एक कलमी कार्यक्रम राणे यांनी चालू केला आहे, अशी टीका पत्रकार परिषदेतून जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली. 

कुडाळ : भाजपचे नेते नारायण राणे यांनी 2005 ते 2014 या कालावधीत जिल्ह्यातील शिवसेनेला चारवेळा हद्दपार करण्याचा प्रयत्न केला; मात्र याच कालावधीत हद्दपारीच्या गोष्टी करणाऱ्यांना जनतेने चारवेळा हद्दपार केले. त्यामुळे  राणे ज्या पक्षात गेले, त्या पक्षात त्यांना हद्दपार करण्याची वक्तव्ये सुचतात, हे आमच्यासाठी नवीन नाही. दुसऱ्यांवर टीका व दोष दाखविणे हा एकमेव एक कलमी कार्यक्रम राणे यांनी चालू केला आहे, अशी टीका पत्रकार परिषदेतून जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली. 

सतीश सावंत म्हणाले की 2019 मध्ये भाजपत गेले नसते तर स्वतःसह त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांना जनतेनेच हद्दपार केले, असते असा टोलाही त्यांनी मारला. सावंत यांनी एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ""स्वतःचा स्वाभिमान पक्ष विसर्जित करून हद्दपारीला राणेंनी सुरुवात केली आहे. स्वतःची हद्दपारी वाचवण्यासाठी राणेंनी विविध पक्ष बदलले. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. सातत्याने हद्दपारीची भाषा करणारे राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपली हद्दपारी जाऊ नये, असे वाटत असेल तर त्यांनी आपल्या सुपुत्रास राजीनामा देण्यास भाग पाडून कणकवली विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान आम्ही देत आहोत.

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात चांगले काम केले आहे. त्यांच्यावर एकेरी टीका करून एक कलमी कार्यक्रम राणे करीत आहेत. हे सुद्धा जिल्ह्यातील जनतेसह राज्यातील जनता ओळखून आहे. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये असताना राणे यांनी कॉंग्रेस पक्ष रक्ताळलेला डाग असे सांगून पक्ष संपवण्याचे काम केले. पुन्हा त्याच पक्षात राहिले. 

सतीश सावंत म्हणाले, "1995 ते 2005 मध्ये पालकमंत्री असताना राणेंनी फक्त विकासाच्या वल्गना केल्या. वीज, रस्ते, पाणी याशिवाय त्यांनी कोणतेही काम केले नाही. टाळंबा, पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करू शकले नाही. हे काम करण्यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर कटिबद्ध आहेत. यावेळी जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हा प्रमुख संजय पडते, अतुल बंगे, विकास कुडाळकर, सचिन काळप, राजू गवंडे, रुपेश पावस्कर उपस्थित होते. 

 
विकास कामांचा नारळ फक्त राणेंनी फोडला विकासाची खिरापत मात्र ते जनतेला कधी देऊ शकले नाही. 1999 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच ते मुख्यमंत्री झाले. त्यावेळी ते शासकीय मेडिकल कॉलेज आणू शकले नाहीत. शिवसेनेच्या महाविकास आघाडीने वर्षभरातच मेडिकल कॉलेजला मान्यता दिली. 42 हजार हेक्‍टर वनसंज्ञाचे शिल्पकार राणेच आहेत. त्यांना हा प्रश्‍न सोडवता आला नाही. माझ्याशिवाय जिल्ह्यात राज्याला कोणालाच काही समजत नाही हा त्यांचा अहंकार वाढू लागलेला आहे. आम्ही 25 वर्षे त्यांच्या सोबत होतो. प्रश्‍न निर्माण करणारे व न सोडविणारे राणेच.

- सतीश सावंत, अध्यक्ष, जिल्हा बॅंक
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख