सुशांतसिंहच्या आत्महत्येची चर्चा पण शेतकऱ्यांच्या मरणाचे गांभीर्य नाही : राजू शेट्टी - Discussion of suicide of Sushant Singh but not the seriousness of death of farmers says Raju Shetty | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंहच्या आत्महत्येची चर्चा पण शेतकऱ्यांच्या मरणाचे गांभीर्य नाही : राजू शेट्टी

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

माध्यमांनी विशेषतः टिव्ही चॅनेलनी सुशांतसिंहचा मुद्दा सतत लावून धरला आहे. 

पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येची जेवढी चर्चा झाली तेवढी चर्चा आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर झाली का? शेतकऱ्यांचं मरण गांभीर्याने का घेतलं जात नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी विचारला आहे

"आजवर हजारो शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या पण त्याची एवढी चर्चा होत नाही. शेतकरी बापाची आर्थिक परिस्थिती पाहून विध्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. काही पोरींनी मरणाला जवळ केलं पण त्या मृत्यूची चर्चा झाली नाही. सुशांतच्या आत्महत्येची मात्र सगळे चर्चा करत आहेत. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये  या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना काही लोक उपासमारीने मेले. काही चालता चालता मरण पावले, एवढ्या भयंकर घटना घडल्या पण त्याची चर्चा झाली नाही."असे शेट्टी म्हणाले.

"आज कोरोना असलेल्या रुग्णांना व्हेंटिलेटर नाही म्हणून लोक मरत आहेत. अशा घटना देशभर घडत आहेत मात्र त्या लोकांच्या मरणाची बिलकुल चर्चा होत नाही. पण सुशांत राजपूत यांच्या मरणाची मात्र चर्चा होत आहे. सुशांत राजपूत यांच्या आत्महत्येची चर्चा रोज केली जात आहे. काही लोकांनी याबाबत नापसंती व्यक्त केली आहे.सगळेच पक्ष त्याच विषयावर बोलत आहेत. एवढी चर्चा कष्टकऱ्यांच्या मरणाची का होत नाही,"असे शेट्टी म्हणाले.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सुशांतसिंहला न्याय मिळाला पाहिजे पण इतरही विषय महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्केंडेय काटजू यांनी तर सुशांतसिंह, सुशांतसिंह असे  ऐकून कान किटल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सुशांतसिंहचा मृत्यू ही आत्महत्या की खून यावरून वाद पेटला आहे. सीबीआयकडे हे प्रकरण गेले आहे. यावरून राजकीय रणधुमाळीही सुरू झाली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख