बंगालमध्ये भाजपला पडणार खिंडार; 33 आमदार तृणमूलच्या वाटेवर - Discussion that 33 BJP MLAs will join Trinamool Congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

बंगालमध्ये भाजपला पडणार खिंडार; 33 आमदार तृणमूलच्या वाटेवर

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 4 जून 2021

भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपमध्ये (BJP) अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे बंगालमधील राजकारण पुन्हा एकदा तापल्याचे चित्र आहे. आता भाजपचे खासदार मुकुल रॉय (Mukul Roy) यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या सोबत भाजपचे ३३ आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल थेट रॉय यांना फोन करुन संवाद साधला होता. (Discussion that 33 BJP MLAs will join Trinamool Congress)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या सोबत भाजपचे 33 आमदारही तृणमूलमध्ये जाणार असल्याची चर्ची आहे. यामध्ये अनेक आमदारांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहित पुन्हा पक्षामध्ये घेण्याची विनंती केली आहे. 

हे ही वाचा : खाजगी हॅास्पिटलची लूट थांबवण्यात राजेश टोपे सपशेल अपयशी

मुकुल रॅाय भाजपमध्ये बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. मुकुल रॉय यांच्या पत्नी आजारी असून, कोलकत्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी (ता. 2 जून) सायंकाळी रुग्णालयाला भेट दिली होती. यानंतर भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच थेट रॉय यांना फोन करुन त्यांच्याशी चर्चा केली. मोदी आणि रॉय यांच्यात काही मिनिटे संवाद झाला. रॉय यांच्या पत्नीच्या प्रकृतीबद्दल मोदींनी विचारपूस केली. त्यांच्यात राजकारणाबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. 
 

दरम्यान, तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले दीपेंदू बिश्वास यांनी बॅनर्जी यांना पत्र लिहिले आहे. भावनेच्या भरात आपण भाजपमध्ये जाण्याच्या चुकीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी बशीरहाट दक्षिण परिसरातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. निवडणुकीपूर्वी सोनाली गुहा, दीपेंदू बिस्वास, रविंद्रनाथ भट्टाचार्य, जटू लाहिडी, शीतल सरकार, सरला मुर्मू यांच्यासह अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण निवडणुकीनंतर सोनाली गुहा आणि सरला मुर्मू आणि दीपेंदू बिश्वास यांचा भाजपमध्ये जाऊन अपेक्षाभंग झाला. 

हे ही वाचा : ओबीसी निकाल फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशाला लागू

दीपेंदू यांच्या अगोदर सोनाली गुहा यांनी ममता दीदींची माफी मागून पुन्हा स्वगृही परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोनाली यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  "ज्याप्रमाणे पाण्याबाहेर मासा राहू शकत नाही, त्याप्रमाणे मी आपल्याशिवाय राहू शकत नाही, "असे सोनाली यांनी ममता दीदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. मालदा जिल्हा परिषद सदस्य सरला मूर्मू आणि उत्तर दिनाजपूरचे आमदार अमोल आचार्य यांनीही तूणमूलमध्ये परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्यीची चिन्हे आहेत.  

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख