खासदाराने सांगितले कोरोना अन् चक्रीवादळे येण्याचे अजब कारण... - Discrimination in citizenship to Muslims emerges COVID19 and cyclones | Politics Marathi News - Sarkarnama

खासदाराने सांगितले कोरोना अन् चक्रीवादळे येण्याचे अजब कारण...

वृत्तसंस्था
बुधवार, 2 जून 2021

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. ही लाट काही आता ओसरू लागली आहे.

लखनऊ : देशात कोरोनाच्या (Covid-19 second wave) दुसऱ्या लाटेने कहर केला. ही लाट काही आता ओसरू लागली आहे. तसेच तोक्ते आणि यास चक्रीवादळांनी देशाची पूर्व व पश्चिम किनारपट्टी झोडपून काढली. राज्य व केंद्र सरकारकडून या दोन्ही आपत्तींवर उपायोजना करत आहे. पण एका खासदाराने या आपत्ती येण्यामागचे कारण शोधले आहे. (Discrimination in citizenship to Muslims emerges COVID19 and cyclones)

मोदी सरकारच्या काळात मागील सात वर्षात मुस्लिमांशी भेदभाव करण्यात आला. शरियत कायद्याचा अपमान करण्यात आला. त्यामुळंच अल्लाहचा कोप होऊन संपूर्ण मानवजातीला कोरोना आणि चक्रीवादळांचा सामना करावा लागत असल्याचा दावा उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन (S. T. Hasan) यांनी केला आहे. हसन हे डॅाक्टर असून अलिगड मुल्सिम विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. 

हेही वाचा : धक्कादायक : लॅाकडाऊनमध्ये कोरोना नव्हे रेल्वे ट्रॅक ठरला 8 हजार 700 जणांसाठी कर्दनकाळ

हसन म्हणाले, मागील दहा दिवसांमध्ये देशात दोन चक्रीवादळे आली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. कोरोना काळात लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे मागील सात वर्षांतील पापाचे प्रायश्चित आहे. शरियत कायद्याशी खेळ करून केंद्र सरकारनं नागरिकत्व कायदा आणला. मुस्लिम समाजावर अन्याय सुरू असून त्यांना नोकरीही मिळत नाही. या सामाजिक भेदभावामुळं हे परिणाम भोगावे लागत आहेत. 

उत्तर प्रदेशात गंगा नदीत मृतदेह सोडले जात असल्याचे आढळून आले आहे. त्यावर बोलताना हसन यांनी सरकारवर टीका केली. नदीत मृतदेह फेकल्याचे तुम्ही कधी ऐकलं आहे का? कुत्री या मृतदेहांचे लचके तोडत आहेत. हा सरकारचा निष्काळजीपणा आहे. भारतात धार्मिक लोक खूप आहेत. जग चालवते अशी एक शक्ती असल्याचे आपण मानतो. तीच शक्ती कोपली आहे, असा दावाही हसन यांनी केला. 

दरम्यान, कोरोनावरून भाजपच्याही काही आमदार, खासदारांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. खासदार प्रज्ञा सिंह यांच्यासह काही जणांनी गोमूत्र पिल्याने कोरोना होत नाही, असा दावा केला होता. तर मध्य प्रदेशातील एका महिला आमदाराने कोरोनाला रोखण्यासाठी होम हवन करण्याचा सल्ला दिला होता. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख