लाखो दिव्यांनी उजळला साई मंदिर परिसर... - Dipotsav excitement in Sai Samadhi temple premises | Politics Marathi News - Sarkarnama

लाखो दिव्यांनी उजळला साई मंदिर परिसर...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

साई समाधि मंदिर बंद असल्याने द्वारकमाई मंदिरासमोर भाविकांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.

शिर्डी : साई समाधी मंदिर परिसरामध्ये दीपोत्सवाचा कार्यक्रम काल उत्साहात साजरा कऱण्यात आला. साई समाधि मंदिर बंद असल्याने द्वारकमाई मंदिरासमोर भाविकांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.

यावेळी साई समाधी मंदिर परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता. साईबाबांनी पाण्याचे दिवे लावून दिवाळी साजरी केली होती, त्याचे स्वरूप मानून आज हजारो साई भक्त साई मंदिर व मंदिर परिसरामध्ये दिवे लावत असतात, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईमंदिर बंद असल्याने द्वारकामाई मंदिरासमोर दिवे लावून  दीपोत्सव भाविकांनी साजरा केला.

यंदा आठ महिन्यांपासून भाविकांच्या दर्शनासाठी बंद असलेले साईसमाधी मंदिराचे दरवाजे पाडव्याच्या मुहूर्तावर उघडणार आहेत. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर साईसंस्थानच्या व्यवस्थापनाने सुधारित दर्शनव्यवस्थेचे नियोजन यापूर्वीच पूर्ण केले आहे. दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग बंधनकारक असेल. पहिल्या टप्प्यात दिवसाकाठी सहा हजार भाविकांना दर्शन घेता येईल. 

दर्शनाचे ऑनलाइन बुकिंग करताना विनाशुल्क व सशुल्क दर्शनासाठी रोज प्रत्येकी तीन हजार भाविकांचा कोटा असेल. सशुल्क दर्शनाचे दर पूर्वीप्रमाणेच असतील. दर्शनबारी व धर्मशाळांतील खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. दर्शनबारीत फवारणी केलेल्या औषधाचा प्रभाव तीन महिने टिकतो. तिरुपतीच्या धर्तीवर दर्शनबारीत ओझोननिर्मिती करून कोविड संसर्गावर नियंत्रण ठेवू शकणारी ट्रायझोन यंत्रणा साईसंस्थानदेखील खरेदी करणार आहे. दर्शन आणि निवासव्यवस्थेची तयारी यापूर्वीच पूर्ण झाली. साईसंस्थानचे प्रसादालय आशिया खंडात सर्वांत मोठे आहे. कोविड काळातील सुधारित भोजनव्यवस्था अद्याप करायची आहे. 

साईबाबा व्यवस्थापन मंडळाने केलेल्या नियोजनाची पाहणी साईसंस्थानच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केली. त्यानुसार येथील दर्शनव्यवस्थेत आवश्‍यक ते बदलदेखील करण्याची तयारी केली आहे. गेल्या आठ महिन्यांत भाविक येत नसल्याने साईसंस्थानचे तब्बल पाचशे कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. बाजारपेठ ठप्प झाल्याने शेकडो लोकांचा रोजगार बुडाला. येथील बाजारपेठेवर रोजीरोटी अवलंबून असलेल्या पाच हजारांहून अधिक छोट्या व्यावसायिकांनी येथून स्थलांतर केले. शिर्डीभोवतालच्या पंचवीस ते तीस गावांच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला. आता साईमंदिर पाडव्यापासून खुले होणार असल्याच्या बातमीमुळे शिर्डीकरांमध्ये उत्साह संचारला आहे. 

उशिरा घेतलेला निर्णय : विखे पाटील

राज्य सरकारने उशिरा का होईना, चांगला निर्णय घेतला. तिरुपती देवस्थान तीन महिन्यांपूर्वीच उघडण्यात आले. त्याच वेळी साईमंदिर खुले केले असते, तर साईसंस्थान व परिसराचे झालेले मोठे आर्थिक नुकसान कमी करता आले असते. राज्य सरकारने हा प्रश्‍न विनाकारण प्रतिष्ठेचा करून, राज्यातील मंदिरांवर रोजीरोटी अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांच्या अडचणीत भर घालण्याचे काम केले, असे मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख