सब्र का फल मिठा होता हेै : वळसे पाटलांकडे गृह खाते येण्याची चिन्हे - dilip walase patil may get home portfolio after resignation of Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

सब्र का फल मिठा होता हेै : वळसे पाटलांकडे गृह खाते येण्याची चिन्हे

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 5 एप्रिल 2021

संयमी नेते म्हणून वळसे पाटलांची प्रतिमा

पुणे :  अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे हे पद जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. परमबीरसिंह यांनी शंभर कोटी रुपयांच्या हफ्तेवसुलीच्या आरोपीचाी सीबीआय चौकशी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गृह खाते रिक्त ठेवणे हे योग्य नसल्याने तातडीने या पदाची सूत्रे नव्या मंत्र्याकडे जाऊ शकतात. त्यात वळसे पाटलांचे नाव आघाडीवर आहे. 

राज्यात दीड वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हाच गृहखाते हे जयंत पाटील किंवा दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाणार अशी चर्चा होती. वळसे पाटलांना याबाबत विचारणा देखील झाल्याचे सांगण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी तब्येतीचे कारण सांगितल्याने ते खाते शरद पवारांनी अनिल देशमुख यांना दिले. पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे तालेवार नेते असताना पुन्हा आपल्याकडे गृहखाते घेऊन अजितदादांना स्पर्धक म्हणून कशाला पुढे यायचे, असाही विचार वळसे पाटील यांनी तेव्हा केला असावा, अशीही चर्चा तेव्हा होती. 

 देशमुख यांच्याकडे महत्वाचे खाते गेले तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांचा त्यासाठी विचार होऊ शकेल, अशी शक्यता तेव्हा व्यक्त होत होती. तसेच जयंत पाटलांनी 2008 ते 2009 या कालावधीत हे पद सांभाळले होते. त्यामुळे या खात्याचा त्यांना अनुभव देखील होती. मात्र देशमुखांवर ही जबाबदारी आली होती.

वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि उत्पादनशुल्क ही दोन खाती आहेत. सरकार स्थापनेनंतर खातेवाटपाच्या वेळी कामगार खात्याला नबाब मलिक नको म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्याकडील खाते वळसे पाटलांकडे आले. पण मलिकांना दुसरे अतिरिक्त खाते काही मिळाले नाही. मलिकांना वळसे पाटलांकडून उत्पादन शुल्क खाते मिळेल असे वाटत होते. पण वळसेंकडे दोन्ही खाती राहिली. सरकार स्थापनेपासून तसे ते `लो प्रोफाईल` राहिले. सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र तेथे ते पुरेसा वेळ देत नसल्याची तक्रार झाली. त्यामुळे त्यांच्याकडून ती जबाबदारी काढून घेण्यात आली आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ती देण्यात आली. ती जबाबदारी गेल्यानंतरही वळसे पाटलांनी फारसी कुरकुर केली नाही. राष्ट्रवादीच्या निर्णय प्रक्रियेत ते फारसे पुढे येत नव्हते. आता मात्र ते पुन्हा हाय प्रोफाईल मंत्री होण्याची शक्यता वाढली आहे. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादी ताकही फुंकून पिणार, यात वाद नाही. त्यामुळे पुन्हा जयंत पाटील आणि वळसे पाटील हे दोन चेहरे पुढे येत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत नवा आरोग्यमंत्री देण्याऐवजी टोपे यांनाच तेथे ठेवले जाण्याचीही सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखा खमका गृहमंत्री हवा, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटते. पण गृहखात्यापेक्षा अर्थ खात्याच्या माध्यमातून अधिक विकासकामे करता येतील, असे अजितदादांना वाटते. त्यामुळे जयंत पाटील किंवा वळसे पाटील या दोन नावांचा विचार अधिक होऊ शकते, असे बोलले जाते. विरोधी भाजपने केलेल्या आरोपामुळे बदल केला असा संदेश जाऊ नये यासाठी थोड्या विलंबाने मंत्रीमंडळात बदल करण्याचे नियोजन असल्याचे दिसून येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख