बिहारचे मैदान शिवसेनेच्या स्टार प्रचारकांनी सोडले का ?  - Did Shiv Sena's star campaigners leave Bihar? | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारचे मैदान शिवसेनेच्या स्टार प्रचारकांनी सोडले का ? 

प्रकाश पाटील 
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

शिवसेनेने प्रारंभी स्टार प्रचारकांची तीस जणांची टीमही बिहारसाठी सज्ज केली होती. पुढे ती वीसवर करण्यात आली.

पुणे : बिहारच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यातच राज्याचे राजकारण पार ढवळून निघाले. मुख्यमंत्री नितीशकुमार, राजदचे नेते तेजस्वी यादव, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांच्या झंझावाती प्रचाराने राज्याचे राजकारण ढवळून निघाले. हे तीनच नेते देशात प्रकाशझोतात राहिले.त्यानंतर इतर पक्षाचे नेते होते. 

बिहारमध्ये राणाभीमदेवी थाटात उमेदवार उभे करण्याचा आणि मुलुखमैदानी तोफा तेथे पाठवून बिहारचा बालेकिल्ला जणू काही खेचून आणणार असल्याच्या अविर्भात शिवसेनेने तयारी केल्याचे बोलले जात होते

पण, आजपर्यंत तरी तेथे शिवसेनेचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह एकही स्टार प्रचारक फिरकलाच नसल्याचे दिूस नयेत आहे. कुठे गेले शिवसेनेचे स्टार प्रचारक. ज्या गुलाबराव पाटलांवर बिहारची जबाबदारी दिली आहे ते ही महाराष्ट्रात घुटमळत असल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ शिवसेनेला बिहारच्या राजकारणात काही इंटरेस्ट दिसत नाही. 

यावेळच्या बिहार निवडणुकीचा आणि महाराष्ट्राचा तसा संबंध काही महिन्यापासून जोडला जात होता. त्याला कारणही अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण होते. सुशांत हा मुळचा बिहारी. तो अभिनय क्षेत्रात करिअर करायला मुंबईत आला आणि यशस्वी झाला. मात्र त्याच्या आत्महत्येनंतर काही प्रश्‍न उपस्थित राहिले आणि बिहार-महाराष्ट्राचे राजकारण गेल्या तीन चार महिन्यापासून पार ढवळून निघाले. सुशांतच्या वडलांपासून तेथील निवृत्त डीजीपी गुप्तेश्‍वर पांडे ते नितीशकुमार, तेजस्वी यादवांपर्यतं सुशांतच्या मुद्याला हात घालत बिहार तरूणांवर कसा अन्याय होतो. याचीही जोरात चर्चा झाली. 

बॉलिवूडमधील घराणेशाहीमुळे एखादा होतकरू अभिनेता आत्महत्या कसा करतो ? असे प्रश्‍न अभिनेत्री कंगना राणावत हिने उपस्थित केले. इतकेच नव्हे तर तिने बॉलिवूडला गटार म्हटले. या सर्व घडामोडी घडत असताना कंगनाने मुंबई पोलिसांवर आणि मुंबईला पीओके म्हटल्याने वाद अधिकच चिघळला.

मुंबई आणि मराठी माणसाच्या मुद्यावर शिवसेना गप्प कशी काय बसेल. कंगणाला शिवसेनेने लक्ष्य केले. तिचे अनधिकृत घर पाडले हा सगळा खेळ घडला तो सुशांतच्या आत्महत्येनंतर. त्यामुळे बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे होत आहे आदी मुद्देही पुढे आले. परंतु सुशांतचा मुद्दा बिहारच्या राजकारणात चालला नाही. निवृत्त डीजीपी गुप्तेश्‍वर पांडेंना ना भाजपने उमेदवारी दिली ना जेडीयूने त्यामुळे सुशांतच्या प्रकारची चर्चाच झाली नाही. 

तरीही बिहारच्या निवडणुकीत शिवसेना जोमाने उतरणार होती. तेथे भाजपला नुकसान पोचविण्याचा तिचा प्लॅन होता. तशी चर्चा सुरू होती. शिवसेनेने प्रारंभी स्टार प्रचारकांची तीस जणांची टीमही बिहारसाठी सज्ज केली होती. पुढे ती वीसवर करण्यात आली. तेथे काही जागा लढविणार असल्याचेही बोलले जात होते. मंत्री गुलाबराव पाटलांनी तर पूर्ण तयारी केली होती. मात्र पहिला टप्प्टासाठी मतदान झाल्यानंतरही शिवसेना तेथे काही दिसली नाही. 

शिवसेनेचा एकही स्टार प्रचारक बिहारच्या मैदानात आजपर्यंत उतरल्याचे दिसत नाही. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, संजय राऊत, गुलाबराव पाटील, प्रियंका चतुर्वेदी आदी नेत्यांचा समावेश होता. खरेतर बिहारमध्ये शिवसेनेला काही इंटरेस्ट आहे असे दिसून येत नाही. 

आता दुसऱ्या टप्प्यासाठीही तेथील प्रमुख तीनच पक्ष खऱ्या अर्थाने मैदानात उतरलेल दिसतात. इतर पक्षांची काहीच हवा नाही. तशी चर्चाही नाही. स्थानिक छोटेमाठे पक्षही आपल्या ताकदीप्रमाणे प्रचार करीत आहेत. मात्र चर्चा तेजस्वी, चिराग आणि नितीशकुमार यांचीच सुरू आहे.

नितीशकुमारांसमोर या दोन पोरांनी मोठे आव्हान उभे केले आहे. यावेळचे मुख्यमंत्री नितीशकुमार की तेजस्वी यादव याची चर्चा सुरू आहे. 

त्यातच चिराग पासवान किंगमेकर बनणार की इतर कुठला स्थानिक पक्ष याकडेही देशाचे लक्ष लागले आहे. शिवसेना मात्र बिहारच्या राजकारणात दिसून येत नाही. राणाभीमदेवी थाटात ज्या शिवसेनेने गर्जना केली त्या बिहारच्या मैदानात निवडणूक लढणे आणि जिंकणे सोपे नाही.

तरीही आपला पक्ष बिहारमध्ये मोठ्या ताकदीने उतणार असल्याची सांगणारी शिवसेना आणि त्यांचे स्टार प्रचारक पहिला टप्पा पार पडल्यानंतरही कुठे दिसत नाही. शिवसेनेने बिहारचे मैदान सोडले का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बिहारच्या निवडणुकीवर संजय राऊत सोडले तर कोणीही बोलत नाही.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख