पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल रजेवर : नियमित रजा की नाराजी यावर चर्चा - DG subhod Jaiswal on leave after so much deliberations on police transfers | Politics Marathi News - Sarkarnama

पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल रजेवर : नियमित रजा की नाराजी यावर चर्चा

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

पोलिसांच्या बदल्यांना 15 आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यामागच्या कारणांची चर्चा

पुणे : राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैयस्वाल हे पाच दिवसांच्या रजेवर गेले असून पोलिसांच्या रखडलेल्या बदल्या आणि त्यांच्या रजेचा काही संबंध तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात पहिल्यांदाच पोलिसांच्या बदल्यांना मोठा विलंब झाला आहे. त्यात तीन पक्षांचे सरकार असल्याने अनेक जिल्ह्यातील मोक्याच्या ठिकाणच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे. या रस्सीखेचमध्ये जयस्वाल यांनीही काही पदांबाबत ठाम भूमिका घेऊन चुकीचे काही करणार नसल्याचे सांगितले होते. तसेच वेळ प्रसंगी आपण रजेवर जाऊ, असा इशारा दिला होता.

कोरोनाच्या काळात बदल्या होणार नाहीत येथपासून ते बदल्यांसाठी वारंवार मुदतवाढीची घोषणा, असा धोरणाचा लंबक हलला. गणेशोत्सव झाल्यानंतर पोलिसांच्या बदल्या कराव्यात, अशी भूमिका पोलिस महासंचालकांनी घेतली होती. त्यालाही मुदतवाढ देत 30 सप्टेंबरपर्यंत त्या करण्याचे ठरले. 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. तसेच काही उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या. तरीही पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. 25 हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या पण त्यांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. पहिल्यांदाच इतक्या संख्येने अधिकारी विनापोस्ट आहेत. मुंबईतील उपायुक्तांच्या बदल्यांचाही घोळ अद्याप संपलेला नाही. या साऱ्या परिस्थितीमुळे पोलिसांच्या बदल्यांसाठीची मुदत पुन्हा पंधरा दिवसांनी 15 आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली.

सोलापूरसारख्या मोठ्या जिल्ह्यात पोलिस अधीक्षकपद रिक्त झाले आहे. तरीही तेथील निर्णय झालेला नाही. रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात अधीक्षक पदावरून स्पर्धा आहे. तेथील खासदार सुनील तटकरे हे आपल्या मर्जीतील अधिकारी रायगडमध्ये आणण्यासाठी हटून बसले आहेत. तर शिवसेनेच्या आमदारांनी तटकरेंचे ऐकू नका, अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली आहे. त्यामुळे रायगडचा निर्णय लांबला आहे. याशिवाय नागपूरच्या पोलिस अधीक्षकपदाचाही निर्णय प्रलंबित आहे.  या साऱ्या घडामोडींची पोलिस दलात जोरात चर्चा आहे. 

मीरा-भाइंदर पोलिस आयुक्तालयाच्या उद्गाटन समारंभ काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाला. त्या समारंभाला जयस्वाल हे उपस्थित होते. त्यानंतर ते रजेवर गेल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार 30 सप्टेंबरला बदल्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर ते 15 दिवसांच्या रजेवर जाणार होते. पण ते अर्धवट राहिल्याने त्यांनी पाच दिवसांची सुटी घेतली आहे. 

जयस्वाल यांनी एक मार्च 2019 रोजी राज्याच्या पोलिस महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतली.  तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची नियुक्ती केली. ते सप्टेंबर 2022 मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांचा कालावधीही अद्याप भरपूर शिल्लक आहे. पुढील दोन वर्षांत पोलिस महासंचालक आणि महाआघाडी सरकार यांच्यात मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोघांत कोणाची आधी विकेट पडणार, यावरही तिरकस चर्चा सुरू असते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख