दरेकर म्हणतात, " प्रदीप गारटकरांनी एकदा आमदार म्हणून निवडून दाखवावे.." - Devidas Darekar's criticism of Pradip Garatkar | Politics Marathi News - Sarkarnama

दरेकर म्हणतात, " प्रदीप गारटकरांनी एकदा आमदार म्हणून निवडून दाखवावे.."

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर बोलत राहिले तर आम्हालाही जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध करावा लागेल, असा इशारा दरेकर यांनी गारटकर यांना दिला आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यावर शिवसेनेचे पुणे जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर यांनी टिका केली आहे. त्यांच्यावर टीका करताना इंदापूर तालुक्यातून एकदा आमदार म्हणून निवडून येऊन दाखवावे, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना जर राष्ट्रवादीचे नेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यावर बोलत राहिले तर आम्हालाही नाईलाजाने जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला टोकाचा विरोध करावा लागेल, असा इशारा दरेकर यांनी गारटकर यांना दिला आहे. 

दरेकर म्हणाले, "प्रदीप गारटकर गेली काही महिने ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासाठी वर्गणी गोळा करण्यात व्यस्त होते. त्यांच्या वर्गणी गोळा करण्याच्या जाहीराती मुळेच राज्य सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे. त्यांच्या या पराक्रमामुळे ते त्यांच्या पक्षात अडगळीत पडले आहेत. जिल्हा परिषदेमध्ये ते फक्त वर्गणीसाठी येत असतात. यापलीकडे त्यांना जिल्हा परिषद माहित नाही. त्यामुळे खेड पंचायत समितीच्या इमारतीच्या थांबवलेल्या कामाबाबत त्यांचा काडीचाही संबंध नाही. शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर बोलण्याची गारटकर यांची अजिबात नैतिक अधिकार नाही. शिवाजीदादा आढळराव पाटील तब्बल तीन वेळा विक्रमी मताधिक्‍याने खासदार झालेले आहेत. सामान्यांचा लोकनेता म्हणून लाखो लोकांचे नेतृत्व स्वीकारतात. एका पराभवाने थांबणारे नसून पुन्हा एकदा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तेच खासदार होणार आहेत." 

"भावनेच्या आहारी झालेली चूक शिरूर मतदार संघातील जनता आगामी लोकसभा निवडणुकीत दुरुस्त करणार असून आजही आढळराव-पाटील सतत लोकांमध्ये काम करत असून त्यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे गारटकर यांनी त्यांच्यावर टीका करताना इंदापूर तालुक्यातून एकदा आमदार म्हणून निवडून येऊन दाखवावे.

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना जर राष्ट्रवादीचे नेते शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यावर बोलत राहिले तर आम्हालाही नाईलाजाने जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला टोकाचा विरोध करावा लागेल," असे दरेकर यांनी म्हटलं आहे. राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्रित काम करत आहेत. जिल्हा पातळीवर खेड पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामासारख्या छोट्या छोट्या प्रश्नांवर राजकीय पक्षात वैचारिक मतभेद असू शकतात. पण, त्याबाबत मित्रपक्षांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढला पाहिजे. परंतु शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभेला पराभूत झाल्यापासून बैचेन आहेत, असा टोला प्रदीप गारटकर यांनी नुकताच लगावला होता.  

राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पुणे जिल्ह्यात मात्र राजकीय कलगीतुरा रंगला आहे. एका व्यंग्यचित्राच्या माध्यमातून शिवसैनिकांनी विशेषतः आढळरावांच्या समर्थकांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर टिकेचे बाण सोडले. कोरोनासारख्या महामारीच्या काळात खासदार मतदारसंघात फिरकत नाहीत, असा आरोप करून ते मतदारसंघाऐवजी चित्रीकरणात व्यस्त आहेत, असेही म्हटले होते. शिवसेनेच्या आरोपाला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले. आढळराव हे शिवसेनेत अस्वस्थ असून ते भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा आरोप करण्यात आला. राज्यात एकत्र असलेल्या या दोन्ही पक्षात जिल्ह्यात विशेषतः शिरूर मतदारसंघात चांगला वाद पेटला आहे. 
 Edited  by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख