फडणवीस घरी येणार हे कळताच खडसे मुंबईला रवाना झाले.... - Devendra Fadnavis visited Eknath Khadse's house | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस घरी येणार हे कळताच खडसे मुंबईला रवाना झाले....

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 1 जून 2021

फडणवीस यांनी भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. त्यांनी खडसेंच्या घरी चहा-नाष्टाही घेतला.

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज जळगावातील मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर होते. माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात आले होते. त्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी हजेरी लावली. मात्र, यावेळी एकनाथ खडसे घरी नव्हते. खडसे दोन दिवसापूर्वीच मुंबईला गेले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. त्यांनी खडसेंच्या घरी चहा-नाष्टाही घेतला. (Devendra Fadnavis visited Eknath Khadse's house)

हे ही वाचा : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरेंवर बारामतीत गोळीबार

एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत भाजपला सोडचीट्ठी दिली होती. त्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच खडसे यांच्या घरी गेले. यावेळी खडसे आणि फडणवीसांमध्ये काही चर्चा होणार का याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले होते. मात्र, फडणवीस घरी आलेले असताना खडसे घरी नसल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना पक्षाचा कोणताही नेता जळगावात असताना खडसे यांच्या घरी गेल्याशिवाय राहत नसे. फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री असतानाही ते खडसे यांच्या घरी अनेक वेळा आले होते. फडणवीस आज घरी आले तेव्हा खडसेंच्या पत्नी आणि मुलगी रोहिणी हे देखील तेव्हा घरी नव्हते. 

खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची ही पहिलीच मुक्ताईनगरला भेट होती. यावेळी भाजप नेते गिरिश महाजन, खासदार उन्मेश पाटील, आमदार संजय सावकारे, मंगेश चव्हाण, सुरेश भोळे यावेळी उपस्थित होते. 

हे ही वाचा : आमदार अनिल भोसलेंना आणखी एक दणका: शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचा परवाना रद्द 

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर पंचायतीमधील भाजपच्या दहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. जळगाव महापालिकेतीन भारतीय जनता पक्षाच्या २९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे भाजपला जळगाव महापालिकेती एकहाती सत्ता सोडावी लागली. हे सर्व नगरसेवक हे एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत असे सांगितले जात आहे. 

राज्यात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ज्येष्ठ नेते म्हणून मुख्यमंत्री पदावर खडसे यांची वर्णी लागेल असी चर्चा होती. मात्र, त्यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना मुख्यमंत्री केले तेव्हापासून फडणवीस आणि खडसे यांचे संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर खडसे यांना मंत्री मंडळातूनही राजीनामा द्यावा लागला होता. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना तिकीट न देता त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांना तिकीट दिले मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे नाराज झालेल्या खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर फडणवीसांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख