वळसेंच्या कारवाईला मी घाबरत नाही...रेमडिसिवर  तुटवडा हे सरकारचं रचलेलं कुंभाड : फडणवीस - Devendra Fadnavis reply to Dilip Walse Patil statement | Politics Marathi News - Sarkarnama

वळसेंच्या कारवाईला मी घाबरत नाही...रेमडिसिवर  तुटवडा हे सरकारचं रचलेलं कुंभाड : फडणवीस

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत देवेंद्र फडणवीसांवर काल टीका केली होती.

मुंबई : रेमडिसिवर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. रेमडिसिवर बाबतचा पोलिस स्टेशनमधील संभाव्य वाद थांबला असून त्यावर आता राजकीय टिप्पण्या सुरू झाल्या आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर काल टीका केली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करून कारवाईचा इशारा वळसे पाटलांनी दिला होता.  याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर केल्या केलेल्या कारवाईवरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी जैन यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर भाजप आमदार प्रसाद लाड हे पोलिस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब विचारला. 

 ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी  पोलिसांनी बोलवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी पोलिस उपायुक्त कार्यालयात धाव घेऊन संबंधित मालकाला सोडविले. त्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांना इशारा दिला आहे.

पोलिस चौकशीसाठी कोणालाही बोलवून शकतात. पोलिसांवर असा दबाव टाकणे योग्य नाही. विरोधी नेत्यांनी शासकीय कामात हस्तक्षेप केला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पोलिसांसमोर सवाल उपस्थित केले. मात्र असा सवाल विरोधी पक्षाला उपस्थित करता येत नाही, असा दावा वळसे पाटील यांनी केला. पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल विरोधी पक्षाच्या नेत्यांवर काय कारवाई करता येईल याची चौकशी करून निर्णय घेतला जाईल, वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले, ''गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे समजंस आहेत, त्यांना मला एवढेच सांगायचे आहे कालच्या घटनेकडे योग्यपद्धतीने पाहिले तर एक लक्षात येईल की जी व्यक्ती महाराष्ट्राला रेमडीसिवर देण्यास तयार होती, केवळ विरोधीपक्षाने आव्हान केले आहे, म्हणून स्टोरी रचून त्या व्यक्तीला पोलिस स्टेशनला चौकशीला बोलाविले. त्या व्यक्तींने कुठलाही गुन्हा केलेला नाही, हे पोलिसांनीही मान्य केले आहे. वळसे पाटील म्हणतात, कारवाई करू, मी वीस वर्ष राजकारणात आहे. जनतेसाठी ३६ केसेस अंगावर घेतल्या आहेत. त्यामुळे अशा कारवाईला मी घाबरत नाही, महाराष्ट्राच्या हितासाठी मी हे करतच राहणार. कालची घटना फार दुदैवी आहे. हे रेमडिसीवर आम्ही भाजपकरीता मागितले नव्हते. ते आम्ही महापालिकेकडे देण्याचे स्पष्ट केलं होतं. त्यानंतर अशा प्रकारचे राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे. आता सरकार बातम्या परविण्याचे काम करत आहे. सरकाचं हे रचलेलं कुंभाड होते, ते बाहेर पडलं आहे. ''  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख