खळबळजनक : पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेची फडणवीस यांची मागणी

सचिव वाझे यांनीच खून केल्याचा हिरेन यांच्या पत्नीचा पोलिसांना दावा...
sachin waze 1 ff
sachin waze 1 ff

मुंबई : मुंबई क्राईम बॅॅंचचे पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना मनसुख हिरेन यांच्या खूनप्रकरणी तातडीने अटक करावी, अशी खळबळजनक मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

शिवसेनेने हिरेन यांच्यासोबत  खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी ज्यांची नावे त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली आहे, त्यांनाही अटक करावी, अशी मागणी करत प्रत्युत्तर दिले.  मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चिठ्ठी फडणवीस यांनी विधानसभेत दाखवली आणि या चिठ्ठीत तेथील प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचेच नाव असल्याचे फडणवीस यांनी त्यावर सांगितले. या दोन्ही प्रकरणांवरून विधानसभेत गोंधळ झाला आणि दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी जिलेटिन भरलेली गाडी सापडली त्याबद्दलचा तपास केंद्रीय गृहखात्याने कालच राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविला. हिरेन यांच्या ताब्यातील ही गाडीच अंबानी यांच्या घरासमोर होती. त्यानंतरच हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास सुरवातील सचिन वाझे यांच्याकडे होता. त्यामुळे हिरेन आणि वाझे यांचे संभाषण झालेले होते. त्यानंतरच वाझे यांचे नाव गेले काही दिवस चर्चेत होते. मात्र फडणवीस यांनी आज आक्रमकपणे थेट वाझे यांच्या अटकेची मागणी केली. 

हसमुख हिरेन यांची गाडी वाझे हेच चार महिने वापरत होते. मृत्यूआधी 26, 27 आणि 28 फेब्रुवारी हे तीन दिवस वाझेंसोबतच होते, अशी माहिती हिरेन यांच्या पत्नीने पोलिस जबाबत सांगितल्याचे फडणवीस यांनी सभागृहात मांडले. हिरेन यांच्या पत्नीचा जबाब फडणवीस यांनी वाचून दाखवला. अंबानींच्या केसमध्ये तू अटक हो, असा आग्रह वाझे यांनी हिरेन यांच्याकडे धरला. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न देखील सुरू केला होता. माझ्या पतीचा खून हा सचिन वाझे यांनीच केला असावा, असेही जबाबात असल्याचे फडणवीस यांनी वाचून दाखविले. धनंजय गावडे आणि सचिन वाझे यांनी खंडणीच्या एका प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता आणि हिरेन यांचे शेवटचे लोकेशन गावडे यांच्याकडे होते, असही फडणवीस यांनी सांगितले. हिरेन यांचा खून गावडे व वाझे यांनी गाडीतच केला आणि त्यांचा मृतदेह भरतीच्या वेळी खाडीत टाकण्यात आला. हा मृतदेह सापडणार नाही, असा आरोपींचा अंदाज चुकला आणि हिरेन यांचा मृतदेह सापडला, असे फडणवीस यांनी सांगितले. 

विधानसभेत गाजलेले सचिन वाझे कोण आहेत ?
 
मुंबई : मुंबई क्राईम ब्रॅंचचे अधिकारी पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांचे नाव विधानसभेत गाजले. गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, आशिष शेलार, सुधीर मुनगंटिवार यांच्या तोंडी वाझेंचे नाव आले.

त्याला कारणही घडले ते प्रसिद्ध उद्योगपती व रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित गाडी आढळून आलेल्या गाडीचे. त्या गाडीत जिलेटीनच्या 25 कांड्याही सापडल्या होत्या. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब आज समोर आली. 
वाझे आणि मनसुख हिरेन यांचे या आधी फोनवरून संभाषण झाले होते. या प्रकरणातील हिरेन हा महत्वाचा दुवा होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. सचिन वाझे यांच्याकडून या प्रकरणाचा तपास का काढण्यात आला, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नांवरून सभागृहात शाब्दिक चकमक उडाली.

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केले होते. 

मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. यामध्ये सचिन वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. या घटनेनंतर वाझे यांनी 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र, तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर त्यांनी 2008 च्या दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला होता.   
सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावर `जिंकून हरलेली लढाई` नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.

 पोलिस दलात असताना वाझे यांनी सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणूनही त्यांनी काम केले. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओमध्ये कामही करत होते. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते. 

नव्वदच्या दशकातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ख्याती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची होती. महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावरून वाद निर्माण झाला होता. इंटेरिअर डेकोरेटर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी गोस्वामी यांना वाझे यांनी अटक केली होती. या अटकेमुळे वाझेंवर भाजप नाराज आहे का, असा सवालही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत विचारला.

त्यानंतर वाझेंचे नाव अनेक नेत्यांच्या ओठी आले. गेली अनेक वर्षे काही ना काही कारणांमुळे चर्चेत असलेले वाझे त्यामुळे विधानसभेतही गाजले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com