जमीन व्यवहारामुळे खडसेंवर राजीनाम्याची वेळ..फडणवीसांचं प्रत्युत्तर - Devendra Fadnavis criticizes Eknath Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

जमीन व्यवहारामुळे खडसेंवर राजीनाम्याची वेळ..फडणवीसांचं प्रत्युत्तर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

एकनाथ खडसे यांच्यावर माझ्यामुळे नव्हे तर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

नवी दिल्ली : "माझ्याविरुद्ध कुभांड रचले गेले. देवेंद्र फडणवीस यांनी मला त्रास दिला. आमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता. नाथाभाऊ वगळता सर्वांना त्यांनी स्वच्छ केले. माझ्याविरुद्ध खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना मुख्यमंत्री भेटत होते. पण मला वेळ देत नव्हते. कोण कोणाला रात्री भेटत होते, याचे सारे पुरावे आता माझ्याजवळ आहेत. त्यामुळे ते मी सारे पुस्तकात मांडणार आहे," असं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल म्हटलं होतं.

यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. दिल्ली दैाऱ्यावर असलेले फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना खडसे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. काल फडणवीस याचं नावं घेऊन खडसे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.   

देवेंद्र फडणवीस म्हणाले की एकनाथ खडसे यांच्यावर माझ्यामुळे नव्हे तर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खडसेंना मनीष भंगाळे यांच्यामुळे नव्हे तर एमआयडीसी जमीन खरेदीव्यवहारामुळे राजीनामा द्यावा लागला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या आगामी पुस्तकाचे नाव जाहीर केले असून `नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान`, या नावाने ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान करणार आहेत. 
      
पेशव्यांचा इतिहास  हा कारस्थानांचा आहे. त्याची पुनरावृत्ती आजही होत आहे. त्याचा त्रास आपल्यालाही झाला आहे. तो आपण `नानासाहेब फडणविसांचे बारभाई कारस्थान` या पुस्तकातून उघड करणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. मुक्ताईनगर येथे "जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे" या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, सुधिर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, यांच्या हस्ते ऑनलाईन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. सुनील नेवे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

खडसे म्हणाले, "पक्षाचे सर्वच नेते खडसे चांगले आहेत. असे म्हणतात. मग माझे विधानसभा निवडणुकीत तिकीट का कापले, हे मला समजत नाही. त्याचाच शोध मी घेत आहे. आता मला भरपूर वेळ आहे. भाचपची सत्ता आणण्यासाठी मी विरोधी पक्षनेता असतान जीव तोडून प्रयत्न केले. विरोधी पक्षनेता हा मुख्यमंत्री होतो, असे समजले जाते. पण मला ते पद दिले नाही. त्याचे मला वाईट वाटत नाही. पण त्यानंतर माझी राजकीय कारकिर्द संपविण्याचा प्रयत्न झाला. माझ्याविरुद्ध कुभांड रचले गेले. देवेंद्र फडणवीस यांनी मला त्रास दिला.  आमचा मुख्यमंत्री ड्रायक्लिनर होता. नाथाभाऊ वगळता सर्वांना त्यांनी स्वच्छ केले. माझ्याविरुद्ध खोटेनाटे आरोप करणाऱ्यांना मुख्यमंत्री भेटत होते. पण मला वेळ देत नव्हते. कोण कोणाला रात्री भेटत होते, याचे सारे पुरावे आता माझ्याजवळ आहेत. त्यामुळे ते मी सारे मांडणार आहे.

 
Edited  by : Mangesh Mahale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख