पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांत आटोपणार; फडणवीसांचा सरकारवर घणाघात - Devendra Fadanvis criticize Maharashtra Government over assembly session | Politics Marathi News - Sarkarnama

पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांत आटोपणार; फडणवीसांचा सरकारवर घणाघात

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 22 जून 2021

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रामध्ये आहेत.

मुंबई : कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसात आटोपते घेतले जाणार आहे. आज राज्य सरकारकडून अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून 5 व 6 जुलै यादिवशी अधिवेशन होईल. दरम्यान, राज्य सरकारकडून कोरोनाचा बहाणा करून अधिवेशन दोन दिवसाचे करत पळ काढल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (Devendra Fadanvis criticize Maharashtra Government over assembly session) 

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रामध्ये आहेत. काही दिवसांपूर्वीच बहुतेक जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तसेच राज्यात सध्या मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. यापार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन होत असून राज्य सरकारने 5 व 6 जुलै असे दोनच दिवस अधिवेशन घेण्याची घोषणा केली आहे. फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. 

हेही वाचा : विजय शिवतारेंच्या पत्नीचे गंभीर आरोप; 27 वर्षांपासून माझ्यापासून अलिप्त

फडणवीस म्हणाले, कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्याचचेच नाही, अशी सरकारची मानसिकता आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी, विजेचे गंभीर प्रश्न, कायदा सुव्यवस्थेची बिकट स्थिती याचे सरकारला काही ही पडलेले नाही. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी होत असताना सरकार पावसाळी अधिवेशनही घेण्याची स्थितीत नाही. अजूनही अध्यक्षांची निवड नाही. सरकारला कोणतेही नियम पाळायचे नाहीत. त्यामुळं आम्ही या निर्णयाचा निषेध करतो.

आम्ही प्रश्न विचारू नये, या उद्देशानेच दोन दिवसांचे अधिवेशन घेतले जाणार आहे. जनतेचे प्रश्न सरकार मांडू देत नाही. पण आम्ही गप्प बसणार नाही. महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांच्या भांडणात जनतेला वेठीस धरले जात आहे. सरकार आहे की तमाशा आहे, असा प्रश्न पडतो. त्यांच्यात समन्वय नसल्याने मराठा आणि ओबीसी आरक्षण रद्द झालं, अशी जोरदार टीका फडणवीस यांनी केली. 

दरम्यान, राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून दोन्ही समाजांमध्ये मोठी नाराजी आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी मुदत दिली आहे. ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारमधील काही मंत्री, आमदारांवर चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. मागील अधिवेशनात मोठा गदारोळ झाला होता. यापार्श्वभूमीवर दोन दिवसांचे आदोलन होणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख