भीमाशंकर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव, खंडोबा देवस्थानांमधील अंतर कमी होणार...गडकरींचे टि्वट - development of tourismvagricultural sectors in Khed Nitin Gadkari | Politics Marathi News - Sarkarnama

भीमाशंकर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव, खंडोबा देवस्थानांमधील अंतर कमी होणार...गडकरींचे टि्वट

रोहिदास गाडगे
गुरुवार, 22 एप्रिल 2021

रिंगरोडच्या कामांमुळे खंडोबा देवस्थान हे पुणे-नाशिक व पुणे-नगर या दोन राष्ट्रीय महामार्गांना अत्यंत जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहे. 

खेड : खेड तालुक्यातील पर्यटन, औद्योगिक व कृषी क्षेत्रांच्या विकासाला चालना देऊन भीमाशंकर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव ही अष्टविनायक व ज्योतिर्लिंग क्षेत्रे व यमाई देवस्थान, कनेरसर खंडोबा देवस्थान जवळच्या अंतरावर आणण्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून ५६ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  दिली आहे. गडकरी यांनी याबाबत टि्वट केले आहे.  

पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मंदिर रिंगरोड (धामणटेक ते मंदिर, मंदिर ते निमगाव गावठाण ते दावडी व पुन्हा धामणटेक) असा रिंगरोड व रोपवे मार्ग व खंडोबा मंदिर पायथ्याशी सुसज्ज असे हेलिपॅड व रेस्ट हाऊस तसेच खंडोबा मंदिर पायथ्याशी रोपवे स्टेशनशेजारी भव्य बगीचा, स्वच्छतागृह, भक्त निवास, वृक्षारोपण त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये हायमॅक्स लाइट इत्यादी सुविधा करण्यात येणार आहेत.

खेड ते मंदिर खरपुडी मार्गे रस्ता व पिंपळगाव ते दावडी मार्गे मंदिर रस्ता हेदेखील होणार आहे. रिंगरोडच्या कामांमुळे खंडोबा देवस्थान हे पुणे-नाशिक व पुणे-नगर या दोन राष्ट्रीय महामार्गांना अत्यंत जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहे. 

भीमाशंकर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव ही अष्टविनायक व ज्योतिर्लिंग क्षेत्रे व यमाई देवस्थान, कनेरसर खंडोबा देवस्थानाशी जवळच्या अंतराने जोडली जाणार आहेत. प्रस्तावित रोप-वेमुळे वयस्कर आणि दिव्यांग लोकांना खंडोबा देवस्थान देवदर्शन सहज शक्य होणार आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील देवस्थान, पर्यटन, औद्योगिक व कृषी क्षेत्रांच्या विकासाला यातून चालना मिळणार आहे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख