समजा जामीन मिळाला तरी हे गुन्हे अर्णव गोस्वामींची वाट पाहत आहेत.... - Despite getting bail these crimes are waiting for Arnav Goswami | Politics Marathi News - Sarkarnama

समजा जामीन मिळाला तरी हे गुन्हे अर्णव गोस्वामींची वाट पाहत आहेत....

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

अर्णव गोस्वामीच्या विरोधात गुन्ह्यांचे जाळे पद्धतशीररित्या गुंफण्यात आले आहे. 

पुणे : रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात अलिबाग पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्याचे पडसाद सोशल मिडियात उमटू लागले आहेत. भाजपने गोस्वामी यांच्या बाजूने उडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी गोस्वामी यांची अटक कशी योग्य होती, यावर सोशल मिडियात बाजू मांडण्यास सुरवात केली आहे.

महाराष्ट्र सरकार विरुद्ध गोस्वामी हे प्रकरण केवळ अन्वय नाईक यांच्या आत्महत्येच्या गुन्ह्यापाशी थांबणार नाही. अनेक बाबी गोस्वामी यांच्याविरोधात आता तयार असल्याची मांडणी दिसून येत आहे. त्याचे पडसाद सोशल मिडियात उमटत आहेत. अन्वय नाईक यांच्या आत्महत्येविरोधाती गुन्ह्यात पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी करूनही गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी मंजूर झाली. त्यामुळे तातडीने जामीनासाठी अर्ज करण्याचा त्यांचा मार्ग खुला झाला. गोस्वामी यांना पोलिस कोठडी मिळाली असती तर त्यांना किमान एक महिना तरी हा तुरुंगातच काढावा लागणार होता. मात्र न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज उच्च न्यायालयात अर्ज केला.

या गुन्ह्यातून त्यांना जामीन मिळाला तर त्यांना इतर गुन्ह्यांत अडकविण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने केली आहे. गोस्वामी यांना अटक करतानाच बराच गोंधळ झाला. त्यात गोस्वामी यांनी एका महिला पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल झाला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यातही पुढे पोलिस त्यांना ताब्यात घेऊ शकतात. याशिवाय इतर दोन प्रमुख प्रकरणेही त्यांची वाट पाहत आहेत. 

त्यातील महत्त्वाचे प्रकरण आहे ते टीआरपी घोटाळ्याचे. या घोटाळ्यात गोस्वामी यांना अटक करण्यासाठी मुंबई पोलिस तयारीत आहेत. एका मराठी चॅनेलच्या मालकाला मुंबई पोलिसांनी यात अटक केल्यानंतर त्यांना जवळपास महिनाभराने यात जामीन मिळाला. त्यामुळे गोस्वामी यांना या प्रकरणात पुन्हा कधीही ताब्यात घेतले जाऊ शकते.

राज्य विधीमंडळाच्या अनेक सदस्यांनी गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा ठराव दाखल केला आहे. त्यासाठीची नोटीस गोस्वामी यांना पाठविण्यात आली आहे. हक्कभंग समितीला शिक्षेची शिफारस करण्याचा अधिकार आहे. त्यावर विधानसभा सदस्य शिक्षेचा निर्णय घेतात. अनेकदा तुरुंगवासाची शिक्षा यात दिली जाते. गोस्वामी यांना अशी शिक्षा देण्यासाठी शिवसेनेचे सदस्य कमालीचे आक्रमक आहेत. त्यामुळे हे प्रकरणही डिसेंबरमध्ये भरणाऱ्या हिवाळी अधिवेशनात चर्चेला येऊ शकते.  याशिवाय मुंबई पोलिसांची बदनामी केल्याबद्दल आणि बाॅलिवूडच्या बदनामीबद्दल न्यायालयात केस दाखल झाल्या आहेत. त्याचाही फटका गोस्वामी यांना बसू शकतो. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख