आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार  - Demonstrations by Dhangar Samaj for implementation of reservation | Politics Marathi News - Sarkarnama

आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाचा एल्गार 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

राज्य धनगर समाज उन्नती मंडळ व सकल धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. 

पुणे : महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी तातडीने करावी, तसेच धनगर समाजावरील हल्ले रोखण्यासाठी कायदे करावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ व सकल धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. 

राज्यातील धनगर समाजाच्या (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी संदर्भात व विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ व सकल धनगर समाजातर्फे पुणे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांना निवेदन दिले. 

धनगर समाजासाठी (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेमध्ये दिले असून त्या आरक्षणाची अंमलबजावणी मागणी धनगर समाज गेल्या 70 वर्षांपासून करीत आहे. तर धनगर व धनगड हा शब्द एकच असून हा वाद संपुष्ठात आला आहे. तरी सरकारने धनगर समाजाचा आरक्षणाचा अध्यादेश लवकरात काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे.  

धनगर समाजातील मेंढपाळावरती वेळोवेळी होणारे हल्ले थांबविण्यासाठी सरकारने कायदा करावा. या कायद्याची अंमलजबावणी कडक स्वरूपात करावी, धनगर समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एक हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. हा निधी उध्दव ठाकरे सरकारने उपलब्ध करून द्यावा. जर आरक्षण मिळाले नाही तर राज्यभर रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष अनिल धायगुडे यांनी दिला आहे . 

यावेळी माजी आमदार रामराव वडकुते यांनी सांगितले की धनगर समाजासाठी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी धनगर समाज सन 1980 पासून संघर्ष करीत आहे. परंतु, वेळोवेळी आंदोलने, निवेदने देऊनही राज्य शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे समाजात शासनाविषयी रोष आहे. तरी महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देऊन अंमलबजावणी करण्याची गरज आहे. 

या आंदोलनामध्ये वडकुते, धायगुडे यांच्यासह महादेव वाघमोडे, बाबाराजे कोळेकर, राजेंद्र कोळेकर, मीना थोरात, शुभांगी कारंडे, माउली ठोंबरे , ऍड. उज्ज्वला हाके, चंद्रशेखर सोनटक्के, बाबुराव बनसोडे, लता लाळे, विकास लवटे, सुवर्णा धायगुडे, फुलचंद राघोजी, बाळासाहेब डफळ, जयवंतराव कवितके, योगेश खरात, भगवान शिंदे, संतोष वाघमोडे, गणेश पुजारी, शिवाजी काळे आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख