महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही! अजित पवारांचा रोख कुणाकडे?

भाजपच्या काळात देशात दमनशाहीचा कारभार सुरु असून लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका पवार यांनी केली.
Democracy in crisis Deputy CM Ajit Pawar criticize central government
Democracy in crisis Deputy CM Ajit Pawar criticize central government

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 22 व्या वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'राज्यात राष्ट्रवादीचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे. जनतेवर अन्याय होईल असा कोणताही निर्णय होऊ देणार नाही. संकटे कितीही येवोत हा महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही. संकटांवर मात करुन महाराष्ट्र सर्वांच्या पुढेच राहील,' असे पवार यांनी ठणकावले. (Democracy in crisis Deputy CM Ajit Pawar criticize central government)

भाजपच्या काळात देशात दमनशाहीचा कारभार सुरु असून लोकशाही मोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पत्रकारांवर निरनिराळे निर्बंध आणून त्यांना केंद्र सरकारच्या बाजूने बोलायला भाग पाडले जात आहे, अशी टीका पवार यांनी केली. पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठत आहेत. घरगुती गॅसचे दर वाढले आहेत. विमान-रेल्वेचा प्रवास महागला आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या सर्व प्रश्नांवर देखील आपल्याला काम करायचे आहे. लोकशाही अबाधित राखण्यासाठी काम करायचे आहे, असे पवार यांनी नमूद केले.

मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण आणि इतर प्रश्नांवर देखील काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली. सरकारतर्फे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आरक्षण, जीएसटी, पीक विमा, १४ व्या वित्त आयोगाचे पैसे मिळावेत, तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशा मागण्या केल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्याप्रमाणे राष्ट्रवादीचा स्थापनाही संघर्षातून

कार्यकर्त्यांची मेहनत व त्यागावर पक्ष उभा आहे. कार्यकर्ता हाच खरा पक्षाचा कणा असतो. त्यांच्याशिवाय कोणताही पक्ष काम करु शकत नाही. राज्याची स्थापना संघर्षातून झाली, तशीच राष्ट्रवादीची संघर्षातूनच स्थापना झाली आहे. २०१४ चा अपवाद वगळता राज्यातील लोकांनी नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला विश्वास दाखवला आहे. सर्व घटकांना सोबत घेऊन पक्ष वाटचाल करत आह.  हृदयात राष्ट्र आणि नजरेसमोर महाराष्ट्र असा विचार घेऊन पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली. जाणकार, अभ्यासू लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीची वाटचाल सुरु झाली होती, अशी भावना पवार यांनी व्यक्त केली. 

संघर्ष आणि आव्हानांशी लढणे हाच राष्ट्रवादीचा गुणधर्म आहे. कोरोना काळ असो की वादळ वा अतिवृष्टीचे संकट, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक ठिकाणी संघर्ष केला. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कोरोना काळात लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली. आपल्याला आणखी काही दिवस अशीच मदत करावी लागणार आहे. महाविकास आघाडीकडून घेतले जाणारे लोककल्याणाचे निर्णय तळागाळात पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com