बापरे : डेल्टा प्लस कोरोना अडीच महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात दाखल 

भारतात या विषाणुचा संसर्ग झालेल्या सुमारे 40 रुग्ण आढळले असून त्यापैकी सर्वाधिक 21 रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
Delta plus Variant of corona present in maharashtra since two month
Delta plus Variant of corona present in maharashtra since two month

मुंबई : देशात कोरोनाची (Covid-19) तिसरी लाट डेल्टा प्लस या विषाणूच्या प्रकारामुळं येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण कोरोनाच्या विषाणूचा हा प्रकार महाराष्ट्रात अडीच महिन्यांपूर्वीच दाखल झाल्याचे समोर आलं आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच काही जणांना डेल्टा प्लसचा संसर्ग झाला होता. संबंधित रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीत ही बाब आढळून आली आहे. (Delta plus Variant of corona present in maharashtra since two month)

भारतात या विषाणुचा संसर्ग झालेल्या सुमारे 40 रुग्ण आढळले असून त्यापैकी सर्वाधिक 21 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोना विषाणुच्या जनुकीय रचनेत सतत बदल होत आहे. भारतात कोरोनाचा कहर केलेल्या कोरोनाच्या डेल्टा या विषाणुच्या प्रकारानंतर आता डेल्टा प्लस हा विषाणू अधिक धोकादायक असल्याचे स्पष्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानंही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. 

मुंबईत 5 व 15 एप्रिल रोजी कोरोनाबाधित आढळून आलेल्या दोन रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल मागील आठवड्यात राज्य सरकारला प्राप्त झाले. या तपासणीमध्ये नमुन्यांमध्ये आढळलेल्या विषाणूंची जनुकीय रचना डेल्टा प्लस विषाणूशी मिळतीजुळती असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळं या विषाणूचा दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात संसर्ग असल्याचे दिसून आले आहे. 

रत्नागिरी व जळगांवमध्ये अनुक्रमे 9 व 7 रुग्ण आढळून आले आहेत. बहुतेक जणांना मे महिन्यातच संसर्ग झाला होता. सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण आढळला आहे. जळगांवमधील सातही रुग्ण विचखेडा या एकाच गावातील आहेत. या गावाची लोकसंख्या 1200 एवढी आहे. पाच मे रोजी त्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यात एनआयव्हीमध्ये पाठवण्यात आले होते. बहुतेक रुग्ण बरे झाले असून त्यांच्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इन्साकॉग- इंडियन सार्स कोवि-2 जीनोम कंसॉर्टीयाच्या अलीकडच्या अध्ययनाच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्यप्रदेश या राज्यांना कोविड-19 च्या डेल्टा प्लस या नव्या व्हेरीयंट म्हणजे प्रकाराबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. हा नव्या स्वरूपाचा विषाणू या राज्यांच्या काही जिल्ह्यात आढळला आहे.

महाराष्ट्रात 21 रुग्ण

डेल्टा प्लस विषाणूचा संसर्ग झालेले 21 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी सर्वाधिक 9 रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात असून 7 जळगावमध्ये, 2 मुंबईत तर ठाणे, पालघर व सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे 7500 नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापुढेही प्रत्येक जिल्ह्यातून असे नमुने जुनकीय रचनेचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत.

या विषाणूच्या स्वरुपाची वैशिष्ट्ये :
- संक्रमण क्षमतेत वाढ
- फुप्फुसांच्या पेशींशी संयुग होण्याची अधिक क्षमता
- मोनोक्लोनल अँटिबॉडी प्रतिसाद कमी होण्याची शक्यता

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com