पैलवान खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळवून देऊ : संभाजीराजे - Delegation holds talks with Sambhaji Raje to get Padma Bhushan award for wrestler Khashaba Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama

पैलवान खाशाबा जाधव यांना पद्मभूषण पुरस्कार मिळवून देऊ : संभाजीराजे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा, या मागणीला खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला आहे.  

कोल्हापूर : भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते पै. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार मिळावा, अशी मागणी गेल्या काही दिवसापासुन जोर धरत आहे. या मागणीला खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा दिला आहे. दिल्ली दरबारी ही मागणी पोहचवू असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले आहे.

स्वातंत्र्यांनंतर भारताच्या पदरात पहिले ऑलिम्पिक पदक टाकणारे महाराष्ट्राचे मल्ल पै.खाशाबा जाधव यांना आजतागायत पद्म पुरस्काराने गौरवले नाही. शासकीय पातळीवर क्रीडाविषक धोरणात असणारी अनास्था दूर व्हावी, यासाठी कुस्ती मल्लविद्या महसंघाचे प्रवक्ते पै. संग्रामसिंह कांबळे चळवळीच्या मदतीने प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिफारस पत्र देऊन सहभाग नोंदवला आहे.

शिष्टमंडळाने संभाजीराजे यांची भेट घेत, दिल्लीच्या क्रीडा मंत्रालयाकडे तसेच पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यापर्यंत ही मागणी पोहचवावी, अशी विनंती केली. संभाजीराजे यांनी दिल्ली मध्ये क्रीडामंत्री किरण रिजीजू यांची भेट घेऊन लवकरात लवकरत खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

यावेळी कुस्ती मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते पै.संग्रामसिंह कांबळे, कुस्ती मल्लविद्या महासंघ कोल्हापूर शहर अध्यक्ष वस्ताद बाबाराजे महाडिक, स्व.खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव यासह शामराव जाधव, विक्रम जाधव, बाबा मुल्लाणी, अशोक शेट्टे उपस्थित होते.

संबंधित लेख