रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या "या" सूचना...

मुख्यमंत्र्यांनीआज राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.
collage (2).jpg
collage (2).jpg

मुंबई : राज्य सरकारने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. 

कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक सरकारसोबत असल्याचे समाधान वाटत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही, त्यामुळे कोरोनासोबत जगतांना अत्यंत काळजीपुर्वक पुढे जावे लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरु करत आहोत. व्यवहार बंद ठेवणे हा काही आवडीचा विषय असूच शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कर रुपात राज्य सरकारला मिळणारा महसूल ही बंद आहे. 

केंद्र सरकारकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची सरकारला जाणीव आहे. म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे.

 माझे कुटुंब माझी जबाबदारी... तशीच तुमचीही...
राज्य शासनाने माझे कुटुंब- माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अवघा महाराष्ट्र  हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिक ही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे, तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकासाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे. 

कोविडमुळे कोरोना योद्धे ही बाधित झाले आहेत, दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेऊन सुरु करत आहोत. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ती त्यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच नाही.

जीवनशैलीत बदल करणे आवश्यक
आता सण उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत. गर्दी होत आहे.. लोकांचा संयम हा देखील महत्वाचा विषय आहे. पण कोरोना सोबत जगतांना आता आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. म्हणजे काय तर मास्क लावणे, हात धुणे,  शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करतांना या तीनही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करा 
या विषाणुने बाधित ८० टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणूचा प्रसार होऊ शकतो जी बाब गंभीर आहे, हे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसीपी आहे... आपले नाते विश्वासाचे असल्याचेही सांगतांना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेऊन यात सहभागी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

सर्व रेस्टॉरंट व्यावसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितले. बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हाँटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलीप दतवाणी, रियाझ अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के. भाटीया आदी उपस्थित होते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com