आरोप गंभीर असल्याने लवकरच निर्णय : पवारांचा धनंजय मुंडेंना `मेसेज` - Decision on Dhananjay Munde soon Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

आरोप गंभीर असल्याने लवकरच निर्णय : पवारांचा धनंजय मुंडेंना `मेसेज`

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

मी माझ्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करणार असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पवारांनी म्हटले आहे. 

मुंबई : ''राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्याने त्यावर पक्ष म्हणून आम्ही लवकरच निर्णय घेऊ,'' असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. त्यावर पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.

शरद पवार म्हणाले, ''मुंडे हे काल मला भेटले होते. त्यांनी मला सविस्तर मला माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबध होते. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. त्याची चैाकशी सुरू आहे. आपल्यावर व्यक्तीगत हल्ले होऊ शकतात, म्हणून मुंडे यांनी याबाबत भूमिका घेऊन न्यायालयात गेले होते. न्यायालयाने याबाबत आदेश दिला आहे. त्यामुळे याबाबत भाष्य करणं चुकीचं आहे. मुंडेंनी सांगितलेली माहिती अन्य मंत्र्यांना सांगणार आहे. मी माझ्या सहकार्यासोबत चर्चा करणार असून लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.''

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''धनंजय मुंडे यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. हा राजकारणाचा मुद्द्या होऊ शकत नाही. मुंडेबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य निर्णय घेतील. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येईल हा भ्रम आहे.'' 

मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. तिने तिच्या जिवाला धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार तरुणीची पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने ट्विट करीत हा प्रकार मांडला आहे. या ट्विटमध्ये तिने मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. ही तक्रार 10 जानेवारीला देण्यात आली होती. ती 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून स्वीकारण्यात आली आहे. या तरुणीने पंतप्रधान मोदींना ट्विट करीतही न्याय मागितला आहे. 

तक्रारीवर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. या सर्व प्रकरणात आता पोलिस गुन्हा दाखल करणार का, मुंडेची आमदारकी रद्द होऊ शकते का, असे प्रश्न विचारले जात आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही तर पोलिसांच्या अंगलट हे प्रकरण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख