नितीशकुमारांना थेट दलाई लामांचे पत्र, पत्रास कारण की... - Dalai Lama writes to Nitish Kumar to congratulate him on the victory | Politics Marathi News - Sarkarnama

नितीशकुमारांना थेट दलाई लामांचे पत्र, पत्रास कारण की...

वृत्तसंस्था
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार हेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप नेत्यांनी नितीश यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. 

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीशकुमार हेच असतील हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी थेट नितीशकुमार यांना पत्र लिहिले आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत झाली होती. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू), भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस, डावे यांची महाआघाडी असे चित्र होते. एनडीने 125 जागा मिळवत स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे. याचवेळी महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. 

राज्यात राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या क्रमांका वर 74 जागांसह भाजप आहे. जेडीयूला 43 जागा मिळाल्या असून, काँग्रेसला 19 जागा आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती.

आता अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी नितीशकुमार हेच मुख्यमंत्री राहतील, असे स्पष्ट केले आहे. भाजप आणि जेडीयूच्या जागांमधील फरकाचा कोणताही परिणाम राज्यातील सत्तासमीकरणावर होणार नाही, असे दिसत आहे.

बिहारच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर दलाई लामा यांनी नितीशकुमारांना पत्र लिहिले आहे. त्यांनी बिहार विधानसभेतील विजयाबद्दल नितीशकुमार आणि एनडीएचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बिहारच्या जनेतच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्यात तुम्ही यशस्वी व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख