नोव्हेंबरमध्येच हुडहुडी..यंदा हवामान मोडणार वेगवेगळे विक्रम... - The current cold wave and thick fog will continue for another two days Different records to break the weather this year  | Politics Marathi News - Sarkarnama

नोव्हेंबरमध्येच हुडहुडी..यंदा हवामान मोडणार वेगवेगळे विक्रम...

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

कोरोना लॉकडाउनपासून दिल्लीतील हवामाननाने यंदा वेगवेगळे विक्रम मोडण्याचेच मनावर घेतल्याचे दिसत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत यंदा नोव्हेंबरमध्येच डिसेंबरप्रमाणे हुडहुडी भरली आहे. आज सकाळी 7.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबरमध्ये इतक्‍या कमी तापमानाचा हा गेल्या चौदा वर्षांतील विक्रम आहे. सामान्य तापमानापेक्षा 5 डिग्री वा त्यापेक्षा जास्त सेल्सिअस कमी तापमान असेल तर ती थंडीची लाट मानली जाते, अशीच परिस्थिती दिल्लीकर सध्या अनुभवत आहेत. 

कोरोना लॉकडाउनपासून दिल्लीतील हवामाननाने यंदा वेगवेगळे विक्रम मोडण्याचेच मनावर घेतल्याचे दिसत आहे. तुलनेने कमी तीव्रतेचा उन्हाळा, अवकाळी पाऊस आणि पाठोपाठ नेहमीच्या आधीच थंडीची पहिली लाट हे चक्र दिल्लीसाठी वेगळे असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये दिल्लीचा पारा 10 अंशांच्याही खाली जाण्याचा प्रसंग 2006 च्या 29 नोव्हेंबरला आला होता. त्यावर्षी 7.3 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद दिल्लीत झाली होती. 

यंदा नोव्हेंबरमध्ये केवळ एक दिवस, 16 नोव्हेंबरला तापमान 16 अंशांवर गेले होते. तो अपवाद वगळता सारा नोव्हेंबर 10 किंवा त्यापेक्षाही कमी तापमानाची दिल्लीत नोंद झाली आहे. केवळ नोव्हेंबरमध्येच नव्हे तर मागच्या महिन्यातही दिल्लीत 58 वर्षांमधील म्हणजे 1962 नंतर प्रथमच किमान तापमानाचा विक्रम (16.9) मोडला गेला होता.

प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले की अशा परिस्थितीत मध्यरात्रीनंतर व सकाळ-संध्याकाळ तीव्र थंडी जाणवते. सध्याची थंडीची लाट व दाट धुकेही आणखी दोन दिवस राहील असा इशारा त्यांनी दिला. हिमालयीन भागांत बर्फवृष्टी झाल्याने दिल्लीत थंडीची लाट आल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, लडाख व उत्तर प्रदेशाच्या अनेक भागांतही पारा घसरला आहे.

संबंधित लेख