330tuljapur.jpg
330tuljapur.jpg

मंदिरे उघडलीच पाहिजे अशा प्रकारचा हट्ट का ?..राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा सवाल

मंदिरे सुरू करायची असतील तर कशाप्रकारची रचना पाहिजे, त्याच्यावर चर्चा करता येईल तुम्ही पुढे या आम्ही सरकारला सांगू... एकत्र बसून ठरवू परंतु मंदिरे उघडलीच पाहिजे अशा प्रकारचा हट्ट का?

मुंबई : मंदिरे सुरू करायची असतील तर कशाप्रकारची रचना पाहिजे, त्याच्यावर चर्चा करता येईल तुम्ही पुढे या आम्ही सरकारला सांगू... एकत्र बसून ठरवू परंतु मंदिरे उघडलीच पाहिजे अशा प्रकारचा हट्ट का? इतर लोक येवून चर्चा करतात तर तुम्हाला चर्चा करायला अडचण का वाटते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमंत टकले यांनी भाजपला केला आहे. 

भाजपच्या तथाकथित अध्यात्मिक आघाडीने तुळजापूर आणि पंढरपूर येथे मंदिरे उघडण्याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर माजी आमदार हेमंत टकले यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत मांडले आहे.

मंदिरे, धार्मिक स्थळे उघडली पाहिजेत. मस्जिद, चर्च, गुरुद्वारा हे धार्मिक अधिष्ठान असलेले वेगवेगळे समुह आहेत. परंतु याचा राजकारणाशी जोडण्याचा काय संबंध... जेव्हा एखाद्या राज्यातील प्रशासन संभाव्य परिणामांचा अभ्यास करून काही गोष्टींबद्दल टप्प्याटप्प्याने निर्णय घेत असते. त्यामुळे उगाचच अगावूपणे अशाप्रकारची आंदोलने करून काय मिळते, असा सवालही हेमंत टकले यांनी भाजपला केला आहे.

थिएटर, मॉल सुरू केले आणि बाजारातही गर्दी दिसते आहे मग मंदिरांनीच काय केले, असा सवालही करत आहेत परंतु मंदिरात येणारा भाविक असतो, त्याची अडवणूक करणं कुणालाही जमणार नाही. वास्तविक कुठल्याही मंदिराचा वास्तू रचनेतून पाहिले तर आतला गाभारा हा लहान असतो. तिरुपती देवस्थानासारखं रांगेत या लांबून दर्शन घ्या ही पद्धत आपल्याकडे नाही. आपल्या धार्मिक स्थळावर त्याला एसओपी म्हणतात तसं तयार केलेले नाही, असेही हेमंत टकले यांनी स्पष्ट केले. 

सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', 'मास्क नाही तर प्रवेश नाही' या सगळ्या एक जनजागरणाच्या मोहिम आहेत. या मोहिमेत अशा मंदिरे उघडा आंदोलनाने खोडा घालण्याचे काम कशासाठी करताय असा आरोपही हेमंत टकले यांनी केला आहे.

एखादा राजकीय पक्ष अशाप्रकारच्या भूमिका कशासाठी घेतो. अध्यात्मिक आघाडीचे कार्यकर्ते वाहिन्यांवर उघड मुलाखती देतात. कुठेतरी वास्तवाकडे गेलं पाहिजे. परमेश्वर जसा तुमचा आहे तसा तो सगळ्यांचा आहे. श्रध्दा सगळ्यांचीच परंतु असं ओंगळ प्रदर्शन करण्याची गरज नाही, असे सांगतानाच त्यावर मार्ग शोधला पाहिजे, समजुतीने घेतले पाहिजे. सरकार यावर मार्ग काढणार आहे, याबद्दल खात्री बाळगली पाहिजे, असा सल्लाही हेमंत टकले यांनी दिला आहे. 

आज आर्थिक संकट मोठं आहे... लोकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत... कारखानदारी बंद पडली आहे... ट्रान्सपोर्टच्या व्यवस्था बंद आहेत. अशावेळेला अशाप्रकारचा हट्ट धरणं औचित्याला धरुन नाही. संबंधित पक्षाच्या नेतृत्वाने फेरविचार करावा, अशी मागणीही हेमंत टकले यांनी केली आहे. 

आपल्याला लोकांच्या श्रध्दा कायम राहाव्यात. लोकांना तो एक दिलासा मिळेल, पण त्याच्यासाठी आवश्यक खबरदारी तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे योग्यवेळी मंदिरे सुरू होतील. त्यासाठीची जी तयारी आहे, ती करुन घेऊन सगळ्या यंत्रणांवरचा ताण कमी करुन लोकांना १०० टक्के दिलासा देणार आहोत, अशी खात्री माजी आमदार हेमंत टकले यांनी दिली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com