मनसेचे दोन पदाधिकारी खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या सापळ्यात.. - crime against two mns office bearers in ransom case pimpri chinchwad | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेचे दोन पदाधिकारी खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या सापळ्यात..

उत्तम कुटे
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

आठवडाभरात खंडणीच्या गुन्हयात पकडला गेलेला हा मनसेचा पुणे जिल्ह्यातील दुसरा पदाधिकारी असल्याने पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात या पक्षात खळबळ उडाली आहे.

पिंपरी : खंडणीच्या गुन्ह्यात पिंपरी पोलिसांनी पकडलेला युनियन लीडर कैलास नरके हा मनसेचा पदाधिकारी निघाला आहे. त्याने गेल्यावर्षीची विधानसभा निवडणूक शिरुर-हवेली (जि.पुणे) मतदारसंघातून लढविली  होती. आठवडाभरात खंडणीच्या गुन्हयात पकडला गेलेला हा मनसेचा पुणे जिल्ह्यातील दुसरा पदाधिकारी असल्याने पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात या पक्षात खळबळ उडाली आहे.  दरम्यान, या दोन्ही प्रकरणांची मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी गंभीर दखल घेतली असून त्यात कारवाईचे संकेत मिळाले आहेत.

वाकी, चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथील एका शाळाचालकाने लॉकडाऊनमध्ये शैक्षणिक शुल्क वाढविल्याने त्यांना धमकावत मनसेचा पुणे जिल्हा संघटक अभय वाडेकर (रा. चाकण)याने त्यांच्याकडे एक लाख रुपये मागितले होते. त्यातील तीस हजार रुपये त्याने भोसरीत घेतले होते. उर्वरित पैशासाठी तो धमकावत असताना चाकण पोलिसांनी त्याला १५ तारखेला पकडले होते. 

त्यानंतर पुणे जिल्ह्यातीलच तळेगाव दाभाडे येथील आमदारकी लढलेला मनसेचा दुसरा पदाधिकारी नरके हा सुद्धा खंडणीच्याच गुन्ह्यात पकडला गेला. प्रदूषणामुळे राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने (एमपीसीबी) बंद केलेली चिंचवड येथील स्टार इंजिनिअर्स प्रा. लि. कंपनी पुन्हा सुरु करण्यासाठी एमपीसीबीचे पुणे प्रादेशिक अधिकारी डॉ. जितेंद्र संघेवार यांच्यावतीने नरकेने वीस लाख रुपये मागितले होते. त्यातील एक लाखाचा पहिला हफ्ता घेताना त्याला पिंपरी पोलिसांनी पुण्यात कल्याणीनगर येथील एका हॉटेलात पकडले होते.

या गुन्ह्यात संघेवारसह आशिष आरबाळे आणि पंढरीनाथ साबळे हे इतर दोन आऱोपी आहेत. त्यांना पकडण्यासाठी दोन पथके रवाना झाली आहेत. त्यातील एक नगरला गेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर, अटक केलेल्या नरकेला २५ पर्यंत पोलिस कोठडी मिळालेली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख