कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्ड भारी! जाणून घ्या फरक... - Covishield produced more antibodies than Covaxin says preliminary study | Politics Marathi News - Sarkarnama

कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्ड भारी! जाणून घ्या फरक...

वृत्तसंस्था
सोमवार, 7 जून 2021

लशींच्या परिणामकतेबाबत संबंधित कंपन्यांकडून अनेक दावे करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाचा (Covid-19) संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. भारतातील आतापर्यंत जवळपास 24 कोटी डोस देण्यात आले आहेत. सिरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादित केली जात असलेली कोविशिल्ड (Civishield) आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन लशींचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारतात काही दिवसांपूर्वीच मान्यता मिळाली आहे. (Covishield produced more antibodies than Covaxin says preliminary study)

लशींच्या परिणामकतेबाबत संबंधित कंपन्यांकडून अनेक दावे करण्यात आले आहेत. सर्वच लशी प्रभावी असल्यातरी प्रत्यक्षात लस दिल्यानंतर त्यांच्या परिणामकातेवरही अनेक देशांत संशोधन सुरू आहे. भारतातही कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींवर प्राथमिक अभ्यास करण्यात आला आहे. या लशींचे डोस घेतल्यानंतर किती प्रमाणात अँटीबॅाडी विकसित होतात, हा या अभ्यासाचा हेतू होता. त्यामध्ये पहिला डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनपेक्षा कोविशिल्ड लशीमुळे  विकसित होणाऱ्या अँटीबॅाडीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. 

हेही वाचा : राज्यातील महापालिका निवडणुका लांबणीवर? राज्य सरकारकडून चाचपणी सुरू

या अभ्यासामध्ये 552 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी 3325 पुरूष आणि 227 महिला होत्या. एकूण 456 जणांनी कोविशिल्ड आणि 96 जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती. पहिल्या डोसनंतर 79.3 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॅाडी विकसित झाल्याचे आढळून आले. कोविशिल्डमध्ये हे प्रमाण 86.8 टक्के तर कोव्हॅक्सिनमध्ये 43.8 टक्के एवढे होते. या कर्मचाऱ्यांमध्ये लस घेण्यापूर्वी किंवा घेतल्यानंतर कोरोना संसर्ग झालेल्यांचाही समावेश होता. 

कोव्हॅक्सिनमुळे पॅाझिटिव्हचे प्रमाण कमी

लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पॅाझिटिव्ह आढळून आलेल्या आरोग्य कमर्चाऱ्यांमध्ये कोविशिल्ड लस घेतलेल्या कमचाऱ्यांचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. कोविशिल्ड लस घेतलेल्या एकूण 399 कर्मचाऱ्यांपैकी 22 जणांना संसर्ग झाला होता. तर कोव्हॅक्सिन घेतलेल्या एकूण 93 जणांपैकी केवळ 2 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. हे प्रमाण अनुक्रमे 5.5 टक्के आणि 2.2 टक्के एवढे आढळून आले. 

दरम्यान, देशामध्ये सर्वाधिक डोस कोविशिल्ड लशीचे देण्यात आले आहे. प्रत्येक दहा व्यक्तींमागे एकाने ही लस घेतली आहे. कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्ड लशीचे उत्पादन अधिक असल्याने या लशीचा वापर अधिक होत आहे. पुढील महिन्यात दोन्ही लशींचे उत्पादन वाढणार आहे. तसेच स्पुटनिक व्ही या लशीचे देशांतर्गत उत्पादनही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या ही लस आयात करावी लागत आहे.  

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख